
निष्ठा आणि नैतिकतेशी सोयरसुतक नसणार्या लाचारांनी सध्या राजकारणात उच्छाद मांडला आहे. या लाचारीविरूद्ध ‘बंड’ म्हणजे शिवसेनेने दिलेले उमेदवार आहेत. सत्तेचे तोंड पाहून निष्ठा बदलणार्या लाचारांना आता एकाच ठिकाणी कायमचे बसवा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बडनेरा मतदारसंघात शुक्रवारी केले. शिवसेना लाचारीला नेस्तनाबूत करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बडनेरा मतदार संघातील शिवसेना- भाजप महायुतीच्या उमेदवार प्रिती बंड यांच्यासह महायुतीच्या सर्व उमेदवारांसाठी दसरा मैदानात आयोजित सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलत होते. बडनेरा मतदार संघातील विद्यमान आमदार व काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराचा नामोल्लेख न करता त्यांच्या सत्तालोलूप, लाचार नेत्यांवर त्यांनी कठोर शब्दात टीका केली. भगव्या तेजाची शिवसेना आणि तिचे मावळे ही विकत घेता येणारी जमात नाही. कोणालाही खरेदी करण्याची मिजाजखोरी दाखविणार्या लाचारांनी शिवसेनेशी वाकड्यात जावू नये,असा इशाराही त्यांनी दिला. शिवसेनेने पुकारलेले हे बंड लाचारी, अन्याय आणि राजकीय अनैतिकतेविरूद्ध सामान्य माणसाच्या मना-मनात खदखदणार्या असंतोषाचे ‘बंड’ आहे. छत्रपती शिवरायांनी त्याकाळात बंड कले नसते तर आज आम्हाला मुघलांची गुलामगिरी करावी लागली असती. त्यामुळे शिवरायांचे वंशज असणारी शिवसेना अशा लाचारीला नेस्तानाबूत करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. पैशाने इतर गोष्टी विकत घेता येतात, पण भगव्या मताची माणसे विकत घेता येत नाही, म्हणूनच ‘जिंकणार म्हणजे जिंकणार’ असे त्यांनी ठणकावले. प्रिती बंड का लढणार असे म्हणणार्यांनी मैदानात उतरून बघावे असे आव्हान देत प्रिती बंड यांना कौल देण्याचे आवाहन मतदारांना केले. अमरावती जिल्ह्यातील शिवसेना-भाजप युतीच्या आठही उमेदवारांना जनता विजयी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेतीला जंगली जनावरांचा त्रास होतो. शेतीचे उत्पन्न कमी होते. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतो. जंगली जनावरेही जगली पाहिजेत आणि शेतकरीही जगला पाहिजे यासाठी शेतीला कुंपण घालणे गरजेचे आहे. शेती जगण्यासाठी विशेष अनुदान देत शेतीला कुंपण करू, तसेच कापूस, सोयाबीन, तूर या पिकासाठी धोरण ठरवू, शेतकर्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. शेतकरी जगला तर जग जगेल यासाठीच शेतकर्यांच्या पाठिशी सरकार उभे राहील असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सध्या राज्यात विरोधकच उरला नाही. टीका करणारीच माणसे युतीत सहभागी झाल्यामुळे सामान्य जनता व शेतकर्यांचा विचार सरकारलाच करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.






























































