…तर राममंदिर बनवण्याच्या जिद्दीने अयोध्येत यावे लागेल!

42

विशेष प्रतिनिधी । अयोध्या

‘लवकरात लवकर राममंदिर व्हावे आणि रामभक्त म्हणून प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाला यावे अशी इच्छा आहे, पण जर मंदिर बांधले नाही तर मग नाइलाज म्हणून अयोध्येत पुन्हा मंदिर बनवण्याच्या जिद्दीने यावे लागेल’, असा खणखणीत इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मोदी सरकारला दिला.

उद्धव ठाकरे यांच्या दोनदिवसीय झंझावाती अयोध्या दौऱ्याची आज सांगता झाली. शरयूच्या तटावर उसळलेल्या भगव्या लाटांचे फटकारे देशाच्या सत्ताधाऱ्यांना बसले. पुन्हा एकदा अयोध्येतच नव्हे, तर अवघ्या देशभरात ‘जय श्रीराम’चा जयघोष घुमला. या दौऱ्याची सांगता होताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी खास बातचित केली. ही मुलाखत तशी छोटेखानी, पण शिवसेनाप्रमुख आणि अयोध्येचे भावनिक नाते, रामजन्मभूमीचे दर्शन आणि तेथील अनुभव, राममंदिराबाबत मोदी सरकारची भूमिका अशा सगळय़ा विषयांचा ऊहापोह करणारी ठरली.

पाहा उद्धव ठाकरे यांची Exclusive मुलाखत

रामजन्मभूमीचे दर्शन घेऊन परतताना तुमच्या मनात काय भावना आहेत?

– मघाशी जो मी शब्द वापरला चैतन्यदायी… हा केवळ वापरायचा म्हणून वापरलेला शब्द नाही, तर तो माझा अनुभव होता. इतकी वर्षे आपण ऐकत आलो होतो राममंदिर, रामजन्मभूमी, अयोध्या. कालपासून मी अयोध्येत आहे, पण मनापासून सांगतो की, आज जेव्हा मी रामजन्मभूमीवर गेलो आणि प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीसमोर उभा राहिलो तेव्हा असा वेगळा अनुभव मला आला. एक रोमांचित करणारा म्हणा किंवा तिथे जी शक्ती आहे तिचा अनुभव मला आला आणि म्हणून मला असं वाटतं की, या विषयाशी आता खेळ न करता लवकरात लवकर राममंदिर उभं राहिलं पाहिजे. कारण हा प्रश्न केवळ अयोध्या, उत्तर प्रदेशपुरता मर्यादित नाही. मी तर म्हणेन हिंदुस्थानपुरताही मर्यादित हा विषय नाही, तर संपूर्ण जगातील हिंदूंच्या अस्मितेचा हा विषय आहे. राममंदिर आपल्या देशात असणं, रामजन्मभूमीच्या ठिकाणी असणं हे एक देशाच्या ओळखपत्राचं किंवा परिचयाचं प्रतीक आहे. आपण जे रामराज्य म्हणतो, रामराज्य म्हणजे न्यायाचं आणि सचोटीचं राज्य. या देशामध्ये न्याय आणि खऱयाचं राज्य. ते आहे हे जर का आपल्याला दाखवायचं असेल, ती जर का आपली ओळख करून द्यायची असेल तर लवकरात लवकर राममंदिर होणं गरजेचं आहे.

उद्धवजी, आपण या प्रश्नाकडे राष्ट्रीय दृष्टीने पाहता की धार्मिक दृष्टीने पाहता?

– दुर्दैवाने हा प्रश्न काहीजणांनी राजकारणाशी जोडलेला आहे. एक नक्की की, सरकारच्या मदतीशिवाय हे काही होणार नाही. कारण हा विषय आता कायद्याच्या कचाटय़ात अडकवला गेलेला आहे. म्हणून तो जर सोडवायचा असेल तर सरकारला पुढे येऊन कायदा करावा लागेल, अध्यादेश आणावा लागेल आणि राममंदिराचा जो कायद्याच्या कचाटय़ात अडकलेला प्रश्न आहे तो सोडवावा लागेल.

आपण दोन दिवसांचा हा दौरा करता आहात, त्यात कोणत्या क्षणी आपल्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली? कारण अयोध्येचं आणि शिवसेनाप्रमुखांचं एक भावनिक नातं आहे.

– मी काल त्या संत मेळाव्यात बोललो होतो. आठवण कोणाची येते, ज्या गोष्टी आपण विसरतो त्याची आठवण येते. मला एकही क्षण असं वाटलं नाही की मला शिवसेनाप्रमुखांची आठवण आली, मी त्यांच्या प्रेरणेनेच इथे आलो. मला नेहमी असं जाणवत असतं की, अशा प्रसंगी ते माझ्या सोबत किंवा कुठे ना कुठे तरी आहेत. ते ज्या काही सूचना करतात त्याप्रमाणे आपण काम करतो अशी माझी भावना आणि धारणा असते.

आपल्या या दौऱ्यानंतर संपूर्ण देशाच्या राजकारणामध्ये एक मोठा बदल होताना दिसतो आहे. राममंदिर हा 25 वर्षांनंतर पुन्हा एकदा देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनला आहे. 25 वर्षांपूर्वी जेव्हा शिवसेनाप्रमुख आपल्यात होते तेव्हासुद्धा त्यांच्या भोवती राममंदिराचे राजकारण फिरत होते. आज ते तुमच्या भोवती फिरत आहे. त्यातून मोदी सरकारवर आपण शिवसेना म्हणून कोणत्या प्रकारचा दबाव आणणार?

– पहिली गोष्ट मी अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो की, हा केंद्रबिंदू मी नाहीच. आजही शिवसेनाप्रमुखच आहेत. कारण आपण पाहिलं असाल, ज्यावेळी मी राममंदिरात दर्शनाला गेलो होतो, असंख्य हिंदू – मग ते विश्व हिंदू परिषदेचे असतील किंवा कुणीही असतील – त्यांना लेबल लावणं चुकीचं आहे. पण मला पाहिल्यानंतर त्यांनी ‘बालासाहब झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. म्हणजे तेही एक तेज आहे. मी असं समजतो की, ती एक विचारधारा आहे, परंपरा आहे. ती मी माझ्यापरीने पुढे घेऊन जात आहे. दबाव टाकण्याचा विषय जर राममंदिरासाठी येत असेल आणि तेसुद्धा हिंदुस्थानात, तर त्याच्यासारखं दुर्दैव नाही. ज्या सरकारने राममंदिराच्या नावावर मतं मागितली आणि ते सत्तेत आले.

तुम्ही तेही दिवस आठवा, जो विषय किंवा उल्लेख तुम्ही केलात, 25 वर्षांपूर्वीचा काळ, त्या वेळेला भारतीय जनता पक्षाचे केवळ दोन खासदार होते. शिवसेनाप्रमुखांनी देशात पहिल्याप्रथम दाखवून दिलं की, देशात हिंदुत्वाच्या विषयावर निवडणूक केवळ लढवली जात नाही तर निवडणूक जिंकली जाऊ शकते. पार्ल्याची पोटनिवडणूक ज्या वेळेला शिवसेनेने आणि शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाच्या विषयावर जिंकली तेव्हा राममंदिर हा मुद्दा नव्हता. तेव्हा हिंदुत्व हाच विषय होता. त्यानंतर 1989 सालापासून मग रथयात्रा काढली गेली. राममंदिराचा विषय आला आणि मग दोनाचे ऐंशी, ऐंशीचे एकशे ऐंशी आणि एकशे ऐंशीचे दोनशे ऐंशी असा हा भारतीय जनता पक्षाचा राजकीय प्रवास झाला. मत मागताना ‘रामराम’ करायचं आणि नंतर आराम करायचा हा जो रोजचा खेळ झाला आहे तो कुठे तरी बंद झाला पाहिजे. म्हणून निवडणुकीच्या तोंडावर मी राममंदिराच्या विषयाला हात घातला आहे.

आपण जेव्हा राममंदिरात दर्शनासाठी प्रवेश केला तेव्हा तिथे जे भाविक आले होते ते आपल्याला पाहून ‘ठाकरेजी राममंदिर बनाईये’ अशा उत्स्फूर्त घोषणा देत होते. लोकांची किंवा देशभरातल्या हिंदूंची आता पुन्हा एकदा राममंदिरासंदर्भात ठाकऱयांकडून अपेक्षा आहे ते आपल्याला जाणवलं का?

– नक्की जाणवलं आणि मी जे तुम्हाला मघाशी उत्तर देताना म्हणालो की, ठाकरेजी याचा अर्थ बाळासाहेब आणि आजदेखील त्यांना असं वाटत आहे की, बाळासाहेबच हे मंदिर करू शकतील. त्यांची शिवसेना, शिवसैनिकच हे काम करू शकेल. मला पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आले की, सरकारने मंदिर बनवलं नाही तर तुम्ही बनवणार का? तेव्हा मी म्हणालो की, आताचे सरकार हे सर्वात ताकदवान सरकार आहे. हे सरकार एवढं मजबूत सरकार आहे की कुणी पाठिंबा काढला तरी हे सरकार पडू शकणार नाही. एवढय़ा ताकदीचं हे सरकार आहे. मग ही ताकद नेमकी कुठे दाखवली जाते. ज्या मुद्दय़ावरून तुम्ही ताकद कमावलीत ती ताकद त्या मुद्दय़ासाठी वापरणार नसाल तर त्या ताकदीचा काही उपयोग नाही.

यानिमित्ताने महाराष्ट्र ते अयोध्या असा एक रामसेतू आपण बांधला आहे आणि रामायणामध्ये रामसेतू महत्त्वाचा आहे. रामसेतूनंतर लंकेवर विजय मिळवता आला आहे. तर या रामसेतूच्या मार्गावर आणि या मार्गावरून जाताना आपण देशाच्या राजकारणामध्ये कोणती भूमिका बजावता?

– पहिली गोष्ट अत्यंत मनापासून सांगतो की, हा रामसेतू बांधण्याचे काम शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेनेनं केलं आहे. मग तुम्ही आहात, एकनाथ शिंदे आहेत, अनिल परब आहेत, महापौर आहेत, सुनील प्रभू आहेत, अनिल देसाई आहेत, नाशिकचेही शिवसैनिक होते. अनेक म्हणजे असंख्य शिवसैनिक आहेत. सगळय़ांचीच नावे घ्यायची तर असंख्य पानं भरून जातील, पण नावं शिल्लक राहतील. त्या सर्व शिवसैनिकांना मनापासून धन्यवाद देतो. या सर्व शिवसैनिकांमुळेच माझ्या अयोध्या यात्रेची सुरुवात झाली.

पुन्हा कधी…?
– माझी तर इच्छा आहे की, लवकरात लवकर राममंदिर व्हावं आणि रामभक्त म्हणून प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाला यावं. पण जर का मंदिर बनलं नाही, बनवलं गेलं नाही, तर मला नाइलाज म्हणून इथे पुन्हा मंदिर बनवण्याच्या जिद्दीने यावं लागेल असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी शेवटी दिला.

आपली प्रतिक्रिया द्या