
महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन नविन पर्वास सुरूवात होत आहे. राज्यात जनकल्याणाचा नवा इतिहास घडत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहेत.त्यामुळे कर्नाटकातील बेळगावसह संपूर्ण सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या अभिनंदनासह महा विकास आघाडीच्या अभिनंदनाचे फलक सीमाभागात झळकू लागले आहेत. तर गुरूवारी होणाऱ्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सीमाभागात आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
भाषिक प्रांतवार रचनेवेळी जबरदस्तीने 865 मराठी भाषिक गावे कर्नाटकात अडकून पडली आहेत. लोकशाहीची गळचेपी करत, अत्याचाराचा कळस गाठणाऱ्या कानडी जुलमाशी टक्कर देत, गेल्या 60 ते 62 वर्षांपासून हे सीमा बांधव महाराष्ट्रात येण्यासाठी धडपडत आहेत. मराठी भाषिकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना नेहमीच धावून आलेले आहेत. 69 शिवसैनिक हुतात्मे झालेले आहेत. स्वतः शिवसेनाप्रमुखांनी सीमा लढ्यात तुरुंगवासही भोगला आहे.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीसुद्धा मराठी भाषिक सीमा बांधवांना आधार दिला आहे.त्यामुळे शिवसेना आणि सीमा बांधव यांच्यात अतूट नाते आहे.
याचप्रमाणे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचीही आत्मीयतेची नाळ या मराठी भाषिक जनतेशी कायमची जोडलेली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आज शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीनही पक्ष महाविकास आघाडीच्या रूपाने एकत्र आलेले आहेत.त्यामुळे सीमा लढ्याला यश येणारच असा विश्वास मराठी भाषिक सीमा बांधवांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे मराठी भाषिक चळवळीचे केंद्र असलेल्या बेळगावसह समस्त सीमाभागातील जनतेत चैतन्याचे वातावरण पसरले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीच्या वेळी रामलिंगखिंड गल्ली, बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यालयासमोर सीमावासियांच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच मराठी जनतेने मोठ्या संखेने आनंदोत्सव साजरा करण्यास उपस्थित रहावे.असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे करण्यात आले आहे.



























































