
मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारे अॅड. असीम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आली आहे. अॅड. सरोदे यांनी न्यायव्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा ठपका ठेवून महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने त्यांची सनद निलंबित केली. याबाबत बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ”आम्ही सर्व स्वातंत्र्यप्रेमी असीमजी तुमच्या सोबत आहोत”, असा विश्वास असीम सरोदे यांना दिला.
”हम करेसो कायदा, त्यावर आवाज उठवणारा देशद्रोही. या दिशेने देशाला फरफटत नेण्याचा हा घातक प्रयत्न दिसतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा , महात्मा ज्योतीराव फुलेंचा अपमान केला तरी त्याला माफी. त्याच्या कारभाराबद्दल सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे मारले तरी काही बोलायचे नाही. मात्र त्यांनी केलेल्या अन्यायाबद्दल बोलणे आणि सत्य सांगणे म्हणजे मोठे पाप आहे असे मानणे म्हणजे लोकशाहीची अवहेलना करणे आहे. थोडक्यात गप्प रहा आणि आमची गुलामगिरी करा या कटाचाच हा एक भाग आहे. या देशात आता सत्यासाठी संघर्षच करावा लागणार. आम्ही सर्व स्वातंत्र्यप्रेमी असीमजी तुमच्या सोबत आहोत”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
गेल्या वर्षी जानेवारीमध्ये शिवसेनेने वरळीत ‘जनता न्यायालय’ भरवले होते. त्यावेळी शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेसंबंधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल अॅड. सरोदे यांनी सोप्या शब्दांत मांडला. तथापि, त्यांच्या विधानातून न्यायव्यवस्था, माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा अपमान झाला, अशी तक्रार भाजप कार्यकर्ता राजेश दाभोळकर यांनी केली.
            
		





































    
    




















