सत्तापिपासूंना सत्तेतून खाली खेचा! उद्धव ठाकरे यांचा भाजपवर घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सत्ता कुणाला नको आहे. सत्ता सगळय़ांनाच हवी आहे. पण वाट्टेल ते करून सत्ता पाहिजे. लोकशाही पायदळी तुडवून, घटनेची कलमे पायदळी तुडवून सत्ता पाहिजे, ही माणसे सत्ताधारी म्हणून देशाला लायक नाहीत. अशा सत्तापिपासूंना आधी खाली खेचायला हवे, असा जबरदस्त घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपवर केला. नुसते लोकांना जागे करून उपयोग नाही तर लोकशाहीच्या रक्षणासाठी आपण एकत्र यायलाच हवे, असे आवाहनही त्यांनी यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांना यावेळी केले.

प्रबोधन प्रकाशनाच्या वतीने ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या नव्या स्वरूपातील संकेतस्थळाचे लोकार्पण आज दादर येथील श्री शिवाजी मंदिर येथे झाले. त्यानिमित्त उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आले होते.

…हे आमचे हिंदुत्व नाही

उद्धव ठाकरे यांनी यावेळी हिंदुत्वावरही भाष्य केले. ‘आम्ही जात-धर्म मानत नाही. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही कोणाला जात विचारली नाही. आज गोमांस सापडले की माणसांना मारले जाते. दुसरीकडे एका महिलेवर अत्याचार केल्यानंतर तसेच तिच्या डोळय़ासमोर तिच्या मुलांना मारल्यानंतर मारेकऱयांचा सत्कार केला जातो, त्यांना सोडून दिले जाते, त्यांना उमेदवारी दिली जाते. हे आमचे हिंदुत्व नाही’, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

काही वर्षांपूर्वी असाच एक कार्यक्रम कलिनात झाला होता. त्यावेळी रामदास आठवले सोबत होते असे उद्धव ठाकरे म्हणताच सभागृहात हशा पिकला. आठवले म्हणाले उद्धवजी, तुम्ही प्रबोधनकारांचे नातू आणि आम्ही वैचारिक नातू. मग मी म्हणालो, असे असेल तर ना‘तू’ करण्यापेक्षा एकत्र येऊया, पण आज प्रकाश आंबेडकर यांना व्यासपीठावर भेटलो याचा मला आनंद आणि अभिमान आहे. माझी आणि प्रकाश आंबेडकर यांची ओळख नाही असे नाही. आम्ही भेटतो, बोलतो, पण त्यांना भेटायचे तर वेळ काढून भेटावे लागते. कारण प्रकाशजी म्हणजे माहिती आणि ज्ञान यांचा धबधबा आहे, असे प्रशंसोद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले. आज पहिल्यांदा एका व्यासपीठावर आलो असलो तरी आमच्या दोघांचे वैचारिक व्यासपीठ एकच आहे. त्यामुळेच आम्हाला एका व्यासपीठावर येण्यास दोघांनाही काहीच अडचण आली नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

याप्रसंगी शिवसेना नेते, प्रबोधन प्रकाशनचे विश्वस्त सुभाष देसाई, ‘प्रबोधनकार डॉट कॉम’चे निर्माते व संपादक सचिन परब उपस्थित होते. कार्यक्रमाला शिवसेना नेते दिवाकर रावते, अनंत गीते, खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, उपनेते राजकुमार बाफना, पराग डाके, शिवसेना सचिव-खासदार विनायक राऊत, अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, आमदार रवींद्र वायकर, संजय पोतनीस, अॅड. अनिल परब, अजय चौधरी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीचेही कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

लोकशाही विरुद्ध हुकूमशाहीचे भांडण सुरू आहे… तुम्हाला काय हवंय?

प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी वैदिक धर्म आणि संत परंपरा यांच्यामधील फरक सांगतानाच यापैकी काय हवे आहे ते निवडण्याची सध्याची योग्य वेळ आहे, असे यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की, ‘प्रबोधनकारांचा इतिहास बारकाईने केला असता त्यांनी वैदिक परंपरेवर आसूड ओढला, त्यांच्या लिखाणातून त्यांनी समाजप्रबोधन केले… समता, बंधुभाव आणि एकमेकांबद्दल आपुलकी निर्माण कशी होईल यावर लिखाण केले. आताच्या काळात धर्माचे भांडण नाही तर लोकशाही विरुद्ध हुकूमशाही असे भांडण सुरू आहे. राजकीय पक्ष म्हणून आम्ही भूमिका घेऊच, मात्र मतदारांनी यापैकी काय पाहिजे हे ठरवले पाहिजे, असे आंबेडकर म्हणाले. प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, ‘महात्मा फुले, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तिघांनीही धर्म नाकारला नाही. धर्म आवश्यक आहे, पण त्याच्या अधिन जाऊ नये असा त्यांचा समज होता. त्यांचे धर्माशी नव्हे तर समाजव्यवस्थेशी भांडण होते. त्यांनी सामाजिक सुधारणांसाठी प्रयत्न केला. आपण समता आणि बंधुभावाचा बळी दिला म्हणून राष्ट्र म्हणून उभे राहू शकलो नाही. माणसे एकत्र येतात ती भाषा आणि संस्कृतीवर. याबद्दलच जर आपुलकी नसेल तर ती एकत्र येणार नाहीत. आता धर्मावर आधारित विचारसरणी पुढे नेण्यात अर्थ नाही.’

आदर्श कोणी कोणाला मानायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नामोल्लेख न करता उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मिश्कील टिप्पणीवर यावेळी सभागृहात हशा पिकला. ते म्हणाले की, ‘आदर्श कोणी कोणाला मानायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपल्या देशात लोकशाही आहे. सध्या येथे दोन नातू बोलत आहेत. काही ठिकाणी आजोबा बोलायला लागले आहेत. त्यांचे नातू काय करतील हे मला माहिती नाही, पण वाट दाखवणारे आदर्श मानायचे की वाट लावणारे, हा मोठा प्रश्न आहे’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

‘प्रबोधनकार डॉट कॉम’चे लोकार्पण

प्रबोधन प्रकाशनच्या ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या नव्या स्वरूपातील संकेतस्थळाचे लोकार्पण आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते आज शिवाजी मंदिर येथे झाले. या संकेतस्थळामुळे जगभरातील अभ्यासकांना प्रबोधनकार ठाकरे यांच्यासंदर्भातील अभ्यास करणे आणखी सुलभ होणार आहे. या संकेतस्थळामध्ये प्रबोधनकारांची पुस्तके, दुर्मिळ पत्रे, चरित्र, नियतकालिके, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ, प्रबंध आदी एकाच ठिकाणी पाहता येणार आहेत.

देशात आणि राज्यात सध्या अराजक वाढले आहे. ते दूर करायचे असेल तर सुजाण, समंजस नेत्यांनी एकत्र आले पाहिजे, असे याप्रसंगी शिवसेना नेते, प्रबोधन संस्थेचे विश्वस्त सुभाष देसाई म्हणाले. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्यासारख्या बुद्धिजिवींना शंभर-शंभर दिवस तुरुंगात डांबून ठेवले जाते हे अराजक नाही तर काय, असा सवाल त्यांनी यावेळी केला. प्रबोधनकार डॉट कॉममुळे प्रबोधनकार ठाकरे यांच्यासंदर्भात माहीत नव्हत्या त्या गोष्टी जगाला माहीत व्हायला लागल्या. या संकेतस्थळावरील माहितीच्या आधारे जगभरातील अभ्यासक अभ्यास करत आहेत. महाराष्ट्राला पुन्हा उभे करायचे असेल तर द्वेषाच्या भिंती कायमच्या तोडाव्या लागतील आणि त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार आवश्यक असल्याचे याप्रसंगी संकेतस्थळाचे संपादक सचिन परब म्हणाले. प्रबोधनकार ठाकरे आणि साहित्यावर पीएचडी करणारे डॉ. मनीष देशमुख आणि डॉ. अनंत गुरव, प्रबोधनकार यांच्या आत्मचरित्राचा मराठी अनुवाद करणारे सतीश व आदित्य वळंजू, संकेतस्थळाच्या निर्मितीत योगदान देणारे अमित चिविलकर आणि विनायक खोत, प्रबोधनकारांच्या कार्यात साथ देणारे रामभाऊ हरणे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

लोकशाहीच्या रक्षणासाठी एकत्र यावेच लागेल! उद्धव ठाकरे यांची साद

बाहेर गुलामगिरी, हुकूमशाही आहे. त्यामुळे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी जे सोबत येतील त्यांच्यासोबत आम्ही जाणार, असे सांगतानाच आपण एकत्र येण्याची वेळ आलेली आहे, असे उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकरांना म्हणाले. आपल्याला हे करावेच लागेल. आपण लोकांना जागे करून पुढे काही करणार नसू तर आपल्या दोघांनाही आपल्या आजोबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. समाजातील विषमता अनुभवताना बाबासाहेब हताश होऊन बसले नाहीत. बाबासाहेबांनी अन्याय भोगला आणि प्रबोधनकारांनीही तो पाहिला. त्याविरुद्ध ते दोघे उभे राहिले आणि लढा दिला, याची आठवणही यावेळी त्यांनी करून दिली.

…तर आम्ही ताबडतोब एकत्र येऊ! आंबेडकरांचा प्रतिसाद

‘राज्यात निवडणुका जाहीर होतील तेव्हा आम्ही एकत्र येऊ. निवडणुका ताबडतोब जाहीर झाल्या तर ताबडतोब एकत्र येऊ. नंतर निवडणुका जाहीर झाल्या तर नंतर एकत्र येऊ,’ अशी प्रतिक्रिया अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांकडे दिली. राज्यातील सध्याचे सरकार स्टे-ऑर्डरवर सुरू आहे. हे राज्यहिताचे नाही. त्यामुळे स्थगिती याचिकेवर तातडीने निर्णय घ्यावा अशी आमची सर्वोच्च न्यायालयाला विनंती आहे, असे ते म्हणाले.