चाणक्य आणि कूटनीतीला खलबत्त्यात कुटून बारीक करणार! उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांवर हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चाणक्य आणि त्याच्या कूटनीतीला खलबत्त्यात कुटून बारीक चूर्ण करणार, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला. भ्रष्टाचाऱ्यांना धुऊन स्वच्छ करणाऱया भाजपच्या लाँड्रीची पश्चिम बंगाल आणि कर्नाटकने जशी विल्हेवाट लावली तशीच या लाँड्रीची विल्हेवाट आपल्याला महाराष्ट्रात लावायची आहे, असा एल्गारही उद्धव ठाकरे यांनी पुकारला.

‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी खालच्या स्तरावर जाऊन फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्या भाजपवर तोफ डागली. ‘‘राष्ट्रवादीसोबतची युती ही आमची कूटनीती असल्याचे कालच अर्धे उपमुख्यमंत्री कुठेतरी बोलले. ही त्यांची कूटनीती आपल्याला कुटून टाकायची आहे. ते आतल्या आत खलबतं करत असतीलही, पण जनतेचा खलबत्ता किती मोठा असतो हे त्यांना अजून कळलेले नाही. याच खलबत्त्यामध्ये हे चाणाक्य आणि त्यांची कुटनीती कुटून त्याचा चूर्ण करायचा आहे,’’ असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यावर ‘कलंक आहेत हे’ म्हणत शिवसैनिकांनी प्रतिसाद दिला.

उत्तर द्यावंच लागेल
विरोधात जाईल, विरोधात बोलेल त्याला घेरण्यासाठी डावपेच आखले जात आहेत. त्याच्यामागे एजन्सी लावण्यात येत आहेत. अफझलखानाची स्वारी आल्यानंतर जे व्हायचं तसंच सध्याच्या सत्ताधीशांकडून सुरू आहे. आपल्या अगदी साध्या साध्या कार्यकर्त्यांनाही ईडी, इन्कमटॅक्स लावून हैराण केले जात आहे. याला आपल्याला उत्तर द्यावंच लागेल, असे नमूद करत उद्धव ठाकरे यांनी पश्चिम बंगाल आणि कर्नाटकचा दाखला दिला.

मुंबई पालिकेवर पुन्हा मजबुतीने भगवा फडकवणार
शिवसेनेत अनेक चांगले कार्यकर्ते येत आहेत. कट्टर आणि कडवट शिवसैनिक सोबत आहेतच. सगळ्यांनाच मी धन्यवाद देतो. चांगल्या काळात सगळेच मागेपुढे असतात; पण संघर्षाच्या, लढण्याच्या काळात तुम्ही माझ्यासोबत आहात. तुमच्यात उत्साह आहेच आणि सोबत जे काही घडलं त्याची चीडही आहे. त्याच जोरावर आपल्याला पुढे जायचे आहे. मुंबई महापालिकेवर जो भगवा फडकलेला आहे तो गेल्या वेळेपेक्षा अधिक स्फूर्तीने, कीर्तीने आणि मजबुतीने पुन्हा फडकवायचा आहे, अशी साद उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना घातली.

गद्दारी गाडणारच
‘शिवसेनेला धक्का’ अशा बातम्या येतात, पण शिवसेनेला धक्का देणारा अजून जन्माला आलेला नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले. तुम्ही मरमर मेहनत केली, रक्त आटवलं आणि ज्यांना निवडून आणलं त्यांनी गद्दारी केली. ही गद्दारी केवळ शिवसेनेशी नाही तर शिवसैनिकांशी आणि जनतेशी झाली आहे. ही गद्दारी आपल्याला गाडून टाकायची आहे, असा वज्रनिर्धार उद्धव ठाकरे यांनी केला.

भाजपच्या लाँड्रीची विल्हेवाट लावायचीय
आज सकाळीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी बोललो. तेथील पंचायत निवडणुकीतील विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तिथे पण पेंद्राची दादागिरी चालली आहे. पंचायत निवडणुकीसाठी पेंद्रीय राखीव दल पाठवले गेले. हिंसाचार घडवला गेला. तरीही बंगालच्या जनतेने यांची लाँड्री धुऊन टाकली. भाजपकडे लाँड्री आहे असे म्हणतात. भ्रष्टाचारी असला की या लाँड्रीत टाकून त्याला स्वच्छ करून घेतात. पण बंगाल आणि कर्नाटकने यांच्या लाँड्रीची विल्हेवाट लावून टाकली आहे. अशीच या लाँड्रीची विल्हेवाट आपल्याला महाराष्ट्रात लावायची आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.