एवढा निर्लज्ज, फडतूस गृहमंत्री याआधी महाराष्ट्राला कधीच लाभलेला नव्हता, उद्धव ठाकरे यांचा घणाघात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लोकसभा निवडणूक निमित्ताने छत्रपती संभाजीनगरला जनसंवाद दौऱ्यावर आले आहेत. सोमवारी सकाळी गंगापूरची सभा आटोपून उद्धव ठाकरे दुपारी वैजापूरला पोहोचले. तिथे जनतेशी संवाद साधताना त्यांनी भाजप व राज्य सरकारवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा देखील खरपूस समाचार घेतला.

”आमच्या एका कार्यकर्त्याची गेल्या आठवड्यात हत्या झाली. त्यानंतर विरोधकांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितल्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की विरोधक कुत्रं जरी गाडीखाली आलं तरी माझा राजीनामा मागतील. एवढा निर्लज्ज, फडतूस गृहमंत्री याआधी महाराष्ट्राला कधीच लाभलेला नव्हता. जर यांच्या लेखी जनता कुत्र्या-मांजरासारखी असेल, तर मतं कुत्रे-मांजराकडे मागा. पण यांना कुत्रासुद्धा मत देणार नाही, कारण कुत्रा इमानदार असतो’, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

”आमच्या राजन साळवींच्या घरावर धाडी पडल्या. त्यांच्या पत्नीवर मुलावर आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यांना सांगण्यात आलं की भाजपात या नाही तर तुरुंगात जा. पण त्यांनी सांगितलं की मी मोडेन पण वाकणार नाही. त्यांच्या घरी सगळ्याची किंमत काढली. कडीची किंमत विचारली, फोटोची किंमत विचाररली. सगळ्या वस्तूंची किंमत ते विचारत होते. महाराजांच्या पुतळ्याची किंमत देखील विचारली. महाराजांच्या पुतळ्याची किंमत काढला तुम्ही. जेव्हा वाजपेयी मोदीजींना कचऱ्याच्या पेटीत टाकायला निघालेले त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी त्यांना वाचवलं. त्या शिवसेनाप्रमुखांच्या खुर्चीचीही किंमत करतायत हे नतद्रष्ट लोकं. हाच कारभार आहे यांचा’, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

अशोक चव्हाणांनी आज राजीनामा दिला. ते तिथे जातील त्यांना राज्यसभेत खासदारकी दिली जाईल. अजित पवार गेले ते तिथे खुर्ची उबवत आहेत. या सगळ्यांकडे बघितलं जातंय पण पण माझ्या शेतकऱ्याकडे कोण बघणार. माझा शेतकरी आत्महत्या करतोय त्याच्या घराकडे कोण बघणार. कापूस, सोयाबिणला भाव मिळत नाहीए. हमीभावाची आश्वासनं देऊनही भाव मिळत नाहीए. आज मराठवाड्यात पाण्याचे टँकर आणावे लागत आहेत. जर आम्ही सर्व भाजपात आल्यावर आमचा शेतकरी समृद्ध होणार असेल तर नका निवडणूका घेऊ. आम्ही तुम्हाला बिनविरोध निवडून देतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

”एकीकडे ते बोलतात अब की बार 400 पार आणि घाम पुसत पुसत इतर पक्ष फोडत चालले आहेत. एवढी कसली भीती वाटतेय यांना? गेल्या दहा वर्षात यांनी काही केलेलं नाही. त्यामुळे हे घाबरले आहेत. गावागावात सरकारचे रथ फिरतायत त्यांना लोकं हाकलून लावत आहे. शेतकरी त्यांना अडवत आहेत. हे भारत सरकार आहेत मग त्या रथांवर मोदी सरकार कुठून आलं. जर सरकारच्या पैसा, सगळ्या काबाड कष्ट करणाऱ्यांच्या पैशाने हे लोकं भारत सरकारची योजना मोदी सरकार म्हणून वापरतायत. त्याच्या जोरावर पुढची दहा वर्ष निवडून येणार म्हणतायत. एवढे काही माझे शेतकरी, जनता भोळीबाबडी नाहीएत, असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील फटकारे –

– मी मुख्यमंत्रीपदाची लढाई लढण्यासाठी मैदानात उतरलेलो नाही, मी जनतेच्या आयुष्याची लढाई लढायला मैदानात आहे

– डरपोक, भेकड, भ्रष्ट लोकांना मी आजही सांगतोय, भाजपमध्ये जा!

– जिथे कमी तिथे आम्ही म्हणणाऱ्या भाजपमध्ये आज अचानक वक्ते आणि कार्यकर्त्यांची कमी का भासायला लागली?

– भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजप पक्ष वाढवावा!

– आता ‘काँग्रेसव्याप्त भाजपा’ म्हणावं लागेल. भविष्यात भाजपचा अध्यक्ष काँग्रेसची एखादी व्यक्ती असणार.

– तुम्ही गद्दारी शिवसेनेसोबत नाही, मतदारांसोबत केली आहे.

– रावणाला शिवधनुष्य नाही पेललं, तर या पन्नास खोकेवाल्यांना काय पेलणार आहे?

– आमच्याकडे चौकीदार नाहीत, शिवसेनेचे राखणदार आहेत!

– शेतकरी ‘जात’ मानत असाल, तर शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरचं कर्ज अजून जात का नाही?

– तुमच्या लेखी जनता कुत्र्या-मांजरासारखी असेल, तर मतं कुत्रे-मांजराकडे मागा. पण यांना कुत्रासुद्धा मत देणार नाही, कारण कुत्रा इमानदार असतो.