…तर तुमच्या महायुतीचा मत मागणारा हात कापल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरे यांचा इशारा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पालघर मतदारसंघाच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर सडकून टीका केली. ”महाराष्ट्राच्या हकक्काचा घास गुजरातला देणार असाल तर तुमच्या महायुतीचा मतं मागणारा हात कापल्याशिवाय राहणार नाही”, असा इशाराच यावेळी उद्धव ठाकरे यांनी महायुतीला व भाजपला दिला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रफुल पटेल यांचा देखील खरपूस समाचार घेतला. प्रफुल पटेल यांनी छत्रपतींचा जिरेटोप मोदींना घातल्याच्या घटनेचा समाचार घेताना उद्धव ठाकरे यांनी प्रफुल पटेल यांच्यावर टीका केली. ”महाराजांचा जिरेटोप ज्या डोक्यावर ठेवताय ते डोकं कसं आहे ते बघा”, असे उद्धव ठाकरे यांनी प्रफुल पटेलांना सुनावले.

”आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे. छत्रपती संभाजी महाराजांकडून स्वराज्य कसं सांभाळाचं ते महाराष्ट्राने पाहिलं. त्यांच्यासमोर जीवन मरणाचा प्रश्न होता. तरीसुद्धा अत्याचाराला न घाबरता, न डगमगता. प्राण गेला तरी बेहत्तर मी औरंगझेबासमोर झुकणार नाही असं ते वागले. नाहीतर आताचे जे नेभळट लोकं फिरतायत त्य़ांना छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

”गेली दहा वर्ष हे सत्तेत आहेत. दहा वर्षात कुणी कुणाच्या पाठीत वार केला ते आपण बघत आलो आहोत. आम्हाला आशा होती की मोदी काहीतरी करुण दाखवतील म्हणून आम्ही त्यांच्या सोबत होतो. पण आता त्यांच्या इंजिनामागे एक एक डबे लागत गेले. डबे जोडत चालले आहेत, पण यांचं इंजिन पुढेच जात नाही. पूर्वी वाफेचे इंजिन होतं तसं यांचं थापांचं इंजिन आहे. आता देशातल्या जनतेने ठरवलंय की दिल्लीतलं मुख्य इंजिनच बदलून टाकायचं आहे. आता ते इंजिन गुजरातला पाठवून द्यायचं आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

”काल भाकड जनता पक्षाचे नेते बेअकली नेते आले होते. यापुढे जो शिवसेनेला नकली म्हणेल ते बेअकली आहे. ज्याला अक्कल असते त्यांना एकदा सांगितलेले कळतं. यांना तर कळतच नाही. मी अमित शहांना सांगतोय तुम्हाला जरा जरी अक्कल असेल माझ्यासोबत व्यासपीठावर या. कुठे म्हणाल तिथे चर्चा करायला तयार आहे मी. मला हवे ते प्रश्न विचारा पण तुम्हालाही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. अमित शहा आरोप करतात की उद्धव ठाकरे राम मंदिरात गेले नाहीत. अमित शहा मी तुमचा अंध भक्त नाही. तुमची पालखी व्हायला मी भक्त नाही. मी याआधीही अयोध्येला जाऊन रामलल्लाच दर्शन घेऊन आलेलो आहे. जेव्हा राम मंदिराचा लोकार्पण सोहळा सुरू होता तेव्हा मी काळाराम मंदिरात गेलेलो. अमित शहा, त्या वेळेला तुम्ही भाऊ गर्दी जमवलेली. बॉलिवूडचे कलाकार होते. नवे भ्रष्टाचारी सोबती होते. पण तुम्ही माझ्या या प्रश्नाचं उत्तर द्या की राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला महामहिम राष्ट्रपती मूर्मू का नव्हत्या. राष्ट्रपती बाईंना गाभाऱ्यात का नेलं नाही, आदिवासी आहेत म्हणून का? याच तुमच्या बुरसटलेोल्या गोमुत्रधारी मानसिकतेविरोधात महामानवाने लढा दिला होता. मंदिरात मोदीजींवर कॅमेरा ठेवून राम राम करत होतात त्यावेळी मी काळाराम मंदिरात गेलेलो, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

”माझा शिकलेला तरुण रोजगारासाठी दारोदारी फिरतोय. तुम्ही दोन कोटी रोजगार देणार होतात. ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवून मत दिलं होतं. त्यांच्या दिमतीला कोणी नाहीए. नोकऱ्या मिळत नाहीए लोकांना. दहा वर्ष झाली तरुणांना नोकऱ्या नाही. तुम्हाला किती टर्म द्यायचे. अग्नीवीर योजना चार वर्षांसाठी. य़ा योजनेतील जवान तो कितीही उत्तम काम करणारा असू दे कॉन्ट्रॅक्ट संपलं तु जा तुझी गरज नाही. अशी कंत्राटी पद्धतीने तुम्ही देशभर कामगार उपलब्ध करत आहात. मग जनतेने तुमचं कॉन्ट्रॅक्ट का रद्द करू नये? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

‘माझ्या मुलाला आणि पवार साहेबांना सुप्रियाला मुख्यमंत्री बनवायचे आहे असे ते म्हणतात. मला आदित्यला आणि पवार साहेबांना सुप्रियाला मुख्यमंत्री करायचं आहे असा आरोप करता. आम्ही आमच्या मुलांसाठी करतो. तुम्हबी स्वत: नवरदेव बनून बोहल्यावर चढायचं. किती वेळा. तुमची हौसच भागत नाही. स्वत: स्वत:साठी प्रचार करत आहेत. आमच्या घराणेशाहीवर आरोप करता मोदीजी इतका घराणेशाहीचा त्रास आहे तर पहिला तुमची खुर्ची सोडा, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

”मोदी म्हणतात 2014 ला मला गंगा माँ ने मला बोलावलेलं. आता वाटतं मला गंगा माँ ने दत्तक घेतलंय. गंगा माँ ने बोलवलं होतं त्याच गंगेत कोरोना काळात मृतदेह फेकलेले तेव्हा त्या गंगेचे अश्रू दिसले नव्हते का? गंगेने मृतदेह फेकायला बोलावलेलं का? मोदीजी हे तुम्ही विसरले असाल पण गंगा माँ आणि देश विसरलेला नाही. गंगेसाठी काय केलं तुम्ही. गंगेचा अपमान केलात. कोरोना काळात गुजरातमध्ये मैदानात सार्वजनिक चिता पेटलेल्या. आणि तुम्ही आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करताय, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

”काय केलंय मोदीजींनी महाराष्ट्रासाठी. मोदींच्या हट्टापायी किती जमिन इथल्या लोकांकडे उरली आहे. जो भाजप अटलजी व आडवणींच्या वेळचा होता. तो आता राहिलेला नाही. भाजपला शिवसेनेने कठीण काळात मदत केली होती. त्यावेळी अवघे दोन खासदार होते देशात भाजपचे. तेव्हा शिवसेनेने साथ दिली नसती तर मोदीजींना दिल्लीचे तख्त दिसलं नसतं. अटलजी तुम्हाला केराच्या टोपलीत टाकयाला निघाले होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट तुमच्या पाठी उभे राहिले नसते. तर मोदीजी तुमचा उदय देशाच्या क्षितीजावर कधीच झाला नसता. मला लाज वाटते की एवढी माणसं निर्ढावलेली कसी असू शकतात. आज मला बाळासाहेबांची नकली संतान म्हणतात. एवढ्या खालची पातळीवर विचार करणाऱ्या माणसाच्या हातात देश द्यायचा”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

”शिवसेनेने वचन दिलं आहे. आपलं इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राचं वैभव मी परत आणल्याशिवाय राहणार नाही. गुजरातला देताना महाराष्ट्राच्या हकक्काचा घास गुजरातला देणार असाल तर तुमच्या महायुतीचा मतं मागणारा हात कापल्याशिवाय राहणार नाही. यांच्या करप्रणालीमुळे जे छोट्या व्यावसायिकांचं नुकसान होतंय ते आम्ही होऊ देणार नाही. इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही हा कर दहशतवाद संपवू. नोटबंदी केल्यानंतर काळापैसा नष्ट करणार सांगितलं होतं. चार दिवसांपूर्वी यांनी अंबानी व अदानींवर आरोप केले की त्यांचा काळा पैसा ते राहुल गांधींना ट्रकने पोहचवत आहेत. म्हणजे हे कुणाचेच नाही, जे देतील साथ त्यांचा करीन मी घात असं यांचं धोरण आहे”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

“याच भागात भाजपची रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आहे. तिथे यांचे चिंतन शिबीर, संस्कार वर्ग भरायचे. मग कुठे गडप झाली ती संस्कार केलेली माणसं. आता नेमकं काय शिकवतायत त्या प्रबोधिनीत. त्या संस्कारातून तयार झालेल्या माणसांवरती आता भ्रष्टचारांच्या सतरंज्या उचलण्याची वेळ आली आहे. याच्यासाठी तुम्ही अट्टहास केला होता. देशात सत्ता आली पाहिजे म्हणून आरएसएसचे अनेक कार्यकर्ते अविवाहीत राहिले, अनेकांनी कुटुंबावर निखारा ठेवला. आली सत्ता पण ती सत्ता तुम्ही नासवून टाकली. विचाराला साथ देऊन तुमच्यासोबत आलेल्यांना तुम्ही दुश्मन मानायला लागला आहात. सांगायला काही नाही मग लाव हिंदु मुसलमान वाद. हे हिंदुत्व शिवसेनेचं नाही. हे हिंदुत्व मला माझ्या वडिलांनी व आजोबांनी शिकवलेलं नाही. आमचं हिंदुत्व मनात राम आणि हाताला काम असं आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.