मिंधे सरकार नालायक… पीक विमा योजनेत 8 हजार कोटी रुपयांचा घोटाळा; उद्धव ठाकरे यांच्या आरोपामुळे खळबळ

पीक विमा योजनेच्या माध्यमातून मिंधे सरकारने तब्बल आठ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला. सरकारने पीक विम्यासाठी आठ हजार कोटी रुपये विमा कंपन्यांच्या बोडक्यावर घातले आहेत आणि त्यानंतरही शेतकऱयांना भरपाई मिळत नाही, मग हा पैसा कुणाच्या खिशात गेला, असा संतप्त सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. दुसऱयाच्या घरची धुणीभांडी करायला जाणारे लोक राज्यकारभार करायला नालायक आहेत असे मी म्हटले होते. तो शब्द मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना लागला होता. पण कर्ज फेडण्यासाठी शेतकऱयांवर स्वतःचे अवयव विकण्याची वेळ ओढवत असेल तर राज्यकर्ते ‘नालायक’च आहेत, असा जबरदस्त टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

पीक कर्ज फेडण्यासाठी पैसे नसल्याने आत्महत्येऐवजी स्वतःचे अवयव विकण्याचा निर्णय हिंगोली आणि वाशीममधील शेतकऱयांनी घेतला. सरकारने ते अवयव विकून कर्जाची परतफेड करावी अशी त्यांची मागणी आहे. हे शेतकरी काल मुंबईत आले असताना पोलिसांनी त्यांना जबरदस्ती अटक करून पोलीस ठाण्यात डांबले. शिवसेनेने त्यांची मदत करून त्यांची मुक्तता केली. त्यानंतर या शेतकऱयांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी आपुलकीने त्यांच्या व्यथावेदना जाणून घेतल्या आणि शिवसेना तुमच्या पाठीशी सदैव उभी आहे, असा विश्वास दिला.

शेतकरी अवयव विकतोय, मग राज्यकर्ते ‘नालायक’च!

शेतकऱयांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रसारमाध्यमांसमोर सरकारच्या दडपशाहीचा अनुभव कथन केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही माध्यमांशी संवाद साधला. या गरीब शेतकऱयांचा काय गुन्हा होता की त्यांना पोलिसांनी अटक केली, असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. ‘‘राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती त्यावेळी आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्यात नव्हते. शेतकऱयांची घरे उद्ध्वस्त असताना दुसऱयांच्या घरात दुसऱयाची धुणीभांडी करायला जाणारी लोपं राज्यकारभार करायला नालायक आहेत, असे मी म्हटले होते. तो शब्द त्यांना लागला. त्यावरुन त्यांना काय करायचे ते करावे. पण मी नागरिकांना विचारतो की, या शेतकऱयांवर अवयव विक्री करण्यापर्यंतची वेळ आली मग राज्य कारभार करणाऱयांना बोलायचं काय?’’ असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

‘अवकाळीग्रस्त भागात जाऊन शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी शेतकऱयांची मदत करत आहेत. शिवसेना नेते-खासदार विनायक राऊत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उपनेत्या सुषमा अंधारे हे शेतकऱयांच्या बांधावर पोहोचले आहेत. सरकारविरोधात मोर्चे निघताहेत. जिल्हाधिकाऱयांना भरपाईबाबत विचारणा केली जातेय,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हात जोडून विनंती करतो, आत्महत्या करू नका, अवयव विकू नका!

‘शेतकरी बांधवांनो, आत्महत्या करू नका, अवयव विकू नका’ अशी हात जोडून विनंतीही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली. शेतकऱयांना उद्देशून ते म्हणाले की, ‘‘कितीही टाहो पह्डलात तरी सरकार तुमचे ऐकायला तयार नाही. तुम्ही घराचे आधार आहात. तुम्ही आत्महत्या केली तर तुमच्यानंतर तुमच्या कुटुंबामागे कोण उभे राहणार? अवयव विकायचा विचार करू नका. कारण हे मिंधे सरकार सगळेच विकतेय. उद्योगधंदे, पंपन्या विकायला काढल्या आहेत. त्यात शेतकरी स्वतःहून त्यांचे अवयव विकत असतील तर त्यांना काहीच फरक पडणार नाही. अविचार करू नका.’’

राज्य सरकारने हिशेब द्यावा!

पीक विमा योजनेवर उद्धव ठाकरे यांनी कठोर शब्दांत टीका केली. ते म्हणाले की, ‘‘पीक विमा योजना हा एक मोठा घोटाळा आहे का अशी शंका यायला लागली आहे. 90 लाखांच्या आसपास शेतकरी पीक विमा घ्यायचे. एक रुपयात पीक विमा मिळणार म्हणून ती संख्या पावणेदोन कोटींवर गेली. शेतकऱयांच्या हिश्श्यापायी राज्य सरकारने आठ हजार कोटी रुपये पीक विमा कंपन्यांना दिले आहेत. त्यानंतरही आज विमा पंपन्यांची कार्यालये बंद आहेत. कुणी पह्न घेत नाहीत, शेतकऱयांना सामोरे जात नाहीत आणि सरकारलाही दाद देत नाहीत. मग ते आठ हजार कोटी रुपये विमा कंपन्यांच्या माध्यमातून कुणाच्या खिशात गेले? शेतकऱयांना त्यातील किती पैसे मिळाले? त्यांना किती मिळायला हवे होते? याचा हिशेब सरकारने द्यावा,’’ अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली.

एवढा खोटारडेपणा देशात यापूर्वी झाला नव्हता!

उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपवरही निशाणा साधत शेतकऱयांना सावध केले. ते म्हणाले की, ‘‘फेब्रुवारीच्या सुमारास लोकसभेचे वेध लागतील आणि आचारसंहिता लागू होईल. मग दिल्लीतील, देशातील, जगभरातील भाजपचे लोक महाराष्ट्रात येतील आणि आश्वासने देतील. त्या आश्वासनांना भुलू नका. पाच राज्यांच्या निवडणुकांवेळी गॅस सिलिंडरचे दर कमी केले होते आणि निवडणूक होताच ते पुन्हा वाढवण्यात आले. एवढा खोटारडेपणा देशात कधीच झाला नव्हता,’’ अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

कृषिमंत्र्यांनी कुठल्या तरी ‘एका घरात’ बसावं आणि सांगावं मदत कशी करणार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कर्जतमधील शिबिरानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. कोरोना काळात उद्धव ठाकरे कुठे बसून काम करत होते हे देशाला माहिती आहे, असे ते म्हणाले होते. त्याबाबत माध्यमांनी विचारले असता, उद्धव ठाकरे यांनी मुंडेंना जोरदार टोला लगावला. धनंजय मुंडेंनी आता कुठल्या तरी एका घरात बसावं आणि सांगावं शेतकऱयांना मदत कशी करणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे नेऊन जाब विचारा!

उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि पदाधिकाऱयांना जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे नेऊन जाब विचारण्याचे आदेश यावेळी दिले. काल-परवा झालेल्या अवकाळीचे पंचनामे करत आहात मग आधीच्या नैसर्गिक आपत्तींचे पंचनामे केलेत का? शेतकऱयांना नुकसानभरपाई कधी मिळणार? किती मिळणार? हे जिल्हाधिकाऱयांना विचारा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

पंचनाम्याचा खेळ थांबवा!

‘‘मी मुख्यमंत्री असताना दोन लाखापर्यंतच्या कर्जाची कर्जमुक्ती केली होती. त्याला शेतकरी साक्ष आहेत. आता पुन्हा शेतकऱयांच्या डोक्यावर बोजा वाढला आहे,’’ असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. ‘‘उद्ध्वस्त शेतांच्या पंचनाम्याचा खेळ थांबवा असा इशारा देतानाच, आता सरसकट नुकसानभरपाई द्या किंवा सरळसरळ कर्जमुक्ती द्या. ज्या यंत्रणेमार्फत महाविकास आघाडी सरकारने कर्जमुक्ती केली होती तीच पद्धत वापरा आणि दोन-पाच महिन्यांत सर्व शेतकऱयांना कर्जमुक्त करून टाका ही शिवसेनेची आग्रही मागणी आहे,’’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्यातील शेतकऱयांनी आता शेतकरी म्हणून एकत्र व्हावे आणि अन्नदात्याची ताकद सरकारला दाखवून द्यावी. या सरकारचे करायचे तरी काय, हा प्रश्न बळीराजाने विचारला पाहिजे. चार दिवस अन्नदात्याला उपाशी राहण्याची वेळ येते, हा अन्नदाता आहे म्हणून आपण जगू शकतो हे सरकारला ठणकावून सांगण्याची वेळ आता आली आहे!