
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सोमवारी मावळ मतदारसंघाच्या दौऱ्यावर येणार असून तिथे त्यांच्या तीन झंझावाती सभा होणार आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दुपारी तीन वाजता तळोजा येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या नव्या भव्य वास्तूचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 4.15 वाजता संजोग वाघेरे- पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होईल. पनवेल येथील गार्डन हॉटेलजवळ उद्धव ठाकरे यांची भव्य सभा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 5.30 वाजता खोपोलीतील डॉ. सतीश जाखोटिया मैदान येथे जाहीरसभा होईल. सायंकाळी 7.30 वाजता उरण येथील नवीन शेवा मैदानावरील भव्य सभेने उद्धव ठाकरे यांच्या मावळ लोकसभेतील तीन मतदारसंघांमधील जनसंवाद दौऱ्याची सांगता होईल.
या सभेसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संपर्कप्रमुख बबन पाटील, जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहर भोईर, पनवेल जिल्हाप्रमुख शिरीष घरत, मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे- पाटील आणि कर्जत-खालापूर विधानसभेचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी, शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे.

































































