वचनपूर्तीसाठी उद्धव ठाकरे 16 जूनला अयोध्येत

uddhavji-new-photo11

सामना ऑनलाईन, लखनौ

अयोध्येतील रामजन्मभूमीवर राममंदिर उभारले गेले पाहिजे असा शिवसेनेचा आग्रह आहे. राममंदिर निर्मितीसंदर्भातील कार्याला गती मिळावी यासाठी गेल्या नोव्हेंबर महिन्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येत गेले होते. त्यावेळी ‘मी पुन्हा अयोध्येत येईन’ असे वचन त्यांनी अयोध्यावासीयांना दिले होते. त्या वचनपूर्तीसाठी उद्धव ठाकरे येत्या 16 जूनला अयोध्येत येणार आहेत.

उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे सर्व विजयी खासदार 16 जूनला अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेतील अशी माहिती शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांना दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येत राममंदिर निश्चितच उभारले जाईल असा विश्वास खासदार राऊत यांनी यावेळी व्यक्त केला. ही लढाई श्रेयासाठी नसून मोदी आणि योगी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राममंदिराची उभारणी करू असे खासदार राऊत म्हणाले. मंदिर या विषयाबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विशेष आस्था आहे. मंदिर लवकर व्हावे ही त्यांचीही इच्छा आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो पण देशातील जनतेने मोदींना निवडून दिले आहे. आम्ही मोदींचे म्हणणे मान्य करू, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नियोजित दौऱयाबाबत या दोन नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली.

राममंदिर हा हिंदूंच्या श्रद्धेचा विषय आहे. अयोध्येशी आमचे भावनिक नाते आहे. लोकसभा निवडणुकीत एनडीएला जो भरघोस विजय मिळाला, तो चार मुद्दय़ांवर. त्यातील एक मुद्दा राममंदिराचा होता, असे आमचे म्हणणे आहे, असेही खासदार राऊत यांनी सांगितले.