शिवतीर्थावर आज महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेचे दर्शन जगाला घडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाविकास आघाडीचे नेते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. अवघा देश या क्षणाची अतिशय उत्कंठेने प्रतीक्षा करत आहे. त्यानिमित्ताने देशालाच काय तर जगाला महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेचे दर्शन घडणार आहे. 140 बाय 50 फुटांचे भव्यदिव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून त्यावर 300 आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

शिवतीर्थावरील शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यासमोरच तब्बल 6 हजार चौरस फुटांचे भव्यदिव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शपथविधीपूर्वी क्रेनच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणार आहेत.

व्यासपीठ तीन भागांत विभागण्यात आले आहे. राज्यपाल, महत्त्वाच्या, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते यांची शपथविधी सोहळ्याला उपस्थिती असणार आहे. त्यादृष्टीने व्यासपीठ तीन भागांमध्ये विभागण्यात आले आहे. व्यासपीठावरील शपथविधी सोहळा प्रत्येकाला पाहता यावा यासाठी 20 एलईडी स्क्रीन्स लावण्यात आल्या आहेत. तसेच प्रमुख पाहुणे आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी एक प्रवेशद्वार ठेवण्यात आले आहे. राज्यभरातून येणार्‍या जनतेला शिवतीर्थावर प्रवेश करण्यासाठी दोन प्रवेशद्वारांमधून प्रवेश दिला जाणार आहे, तर शपथविधी सोहळा संपल्यानंतर एका प्रवेशद्वारातून सोडले जाणार आहे. दरम्यान, शिवतीर्थ सज्ज ठेवण्यासाठी शेकडो कामगार राबत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकार्‍यांनी सांगितले.

एक हजार वाहनांची पार्किंग व्यवस्था

या शपथविधी सोहळ्यासाठी सुमारे एक हजार वाहनांमधून लोक येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. नेतेमंडळी, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी शिवाजी पार्क येथे पार्किंगची सोय असणार आहे, तर राज्यभरातून येणार्‍या मोठय़ा बसेससाठी सेनापती बापट मार्गावर व्यवस्था असेल. तसेच कोहिनूरच्या मागेही पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

सोनिया गांधी, ममता बॅनर्जी, केजरीवाल यांना आमंत्रण

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांना या शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. त्याशिवाय तेलगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव आदी नेतेही उपस्थित राहणार आहेत.

दूरदर्शनवर थेट प्रेक्षपण

मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून या शपथविधी सोहळ्याचे सायंकाळी 6.30 वाजल्यापासून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. सॅटेलाइटद्वारे हा शपथविधी सोहळा संपूर्ण देशात पाहता येणार आहे.

कडेकोट बंदोबस्त

शपथविधी सोहळ्यासाठी सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, खासदार, आमदार, राज्य शासनातील वरिष्ठ अधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर, तसेच सामान्य नागरिक व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार आहेत. यावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मुंबई पोलीस दलातर्फे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्थानिक पोलीस ठाण्याचा बंदोबस्त, सशस्त्र्ा दल, राज्य राखीव पोलीस बल, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, बॉम्बशोधक पथक, मुंबई वाहतूक विभाग तसेच सुमारे 2000 अतिरिक्त पोलीस अधिकारी व अंमलदार असा तगडा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार असून साध्या वेशातील पोलीसही तैनात राहणार आहेत. तसेच वाहतुकीचा अडथळा होऊ नये यासाठी वाहतूक पोलीस आवश्यक खबरदारी घेणार आहेत.