
लातूर जिल्ह्यातील उदगीर या कोरोनाच्या हॉटस्पॉट ठरलेल्या शहरातील आणखी तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे आज अहवालानंतर स्पष्ट झाले आहे. चार व्यक्तींच्या नमुन्याची 48 तासानंतर पुनर्तपासणी करण्यात येणार असल्याने सध्या उदगीर शहरात कोरोनाचे 13 रुग्ण झालेले आहेत.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज एकुण 31 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 28 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 21 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून 3 व्यक्तींचे पॉझिटिव्ह आले आहेत व 4 व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आले असल्यामुळे त्यांची 48 तासानंतर पुनर्तपासणी करण्यात येणार आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 3 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली त्यापैकी सर्वच 3 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आहे आहेत. तसेच आजपर्यंत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेत एकुण 323 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे अशी माहिती विषाणु संशोधन व निदोन प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.
राज्य ग्रीन झोनमध्ये आणण्यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करा! मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट निर्देश
जिल्हाधिकारी, लातुर यांनी जिल्हयात येणाऱ्या व जिल्हयाबाहेर जाणाऱ्या व्यक्तींसाठी नियमावली आदेशित केल्यानुसार त्या व्यक्तींची थर्मल स्कॅनींग व इतर आजार (खोकला, सर्दी, श्वास घेण्यास त्रास) तपासणी करुन बाहेर जिल्हयात जाण्यासाठी विहीत नमुन्यातील वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात येत आहे. सदरील प्रमाणपत्र हे सर्व शासकीय आरोग्य संस्था, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, लातुर महानगरपालिका अंतर्गत येणा-या सर्व आरोग्य संस्था व लातुर जिल्हयातील सर्व नोंदणीकृत खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्यामार्फत देण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या जवळील शासकीय आरोग्य संस्था, रुग्णालय किंवा नोंदणीकृत खासगी वैद्यकीय व्यावसायीक यांच्याकडून वैद्यकीय प्रमाणपत्र घ्यावे असे आवाहान विलासराव देशमुख वैद्यकीय संस्थेचे अधिष्ठाता, डॉ. गिरीष ठाकुर व वैद्यकीय अधिक्षक डॉ. संतोषकुमार डोपे यांनी केले आहे.



























































