
रशियासाठी लढणाऱ्या एका हिंदुस्थानी तरुणाला युक्रेन सैन्याने ताब्यात घेतले आहे. माजोती साहिल मोहम्मद हुसेन असे त्या तरणाचे नाव असून तो मूळचा गुजरातमधील मोरबी येथील रहिवाशी आहे. युक्रेनने एक व्हिडीओ प्रसिद्ध केला असून त्यात हुसेन स्वत:बद्दल सांगताना दिसत आहे.
हुसेन हा रशियातील एका विद्यापीठात शिकण्यासाठी आला होता. तिथे रशिया पोलिसांन त्याला ड्रग्जच्या तस्करीप्रकरणी अटक केली होती. या प्रकरणात त्याला 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. तुरुंगात असताना त्याला पुढची शिक्षा टाळण्यासाठी रशियाच्या सैन्यात भरती होण्याची ऑफर देण्यात आली. त्याने ती ऑफर स्वीकारली. त्यानंतर त्याला प्रशिक्षणासाठी नेण्यात आले होते. सोळा दिवसाच्या ट्रेनिंग नंतर त्याला त्याच्या पहिल्या लढाईसाठी पाठवण्यात आले. मात्र तिथे त्याचे रशियन कमांडर सोबत वाद झाले. त्यामुळे त्याने युक्रेनच्या सैन्याकडे शरणागती पत्करली.
अद्याप हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तरी याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी या प्रकरणी युक्रेनच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात असल्याचे समजते.