नंग्या तलवारी नाचवत बर्थडे केक कापला, उल्हासनगरात भाईगिरी करणा-यांना बेड्या

गावगुंडाच्या वाढदिवशी रात्री एकवटलेल्या तरुणांनी भररस्त्यात नंग्या तलवारी नाचवत वाढदिवसाचा केक कापल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरात उघडकीस आला. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी धडक कारवाई करत दोघांना अटक केली.

उल्हासनगरात गुन्हेगारीकरिता चर्चेत असणा-या कॅम्प नंबर 1 आझाद नगरच्या चौकात गुंड समीर शेख याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तरुणाई एकवटली होती. त्याला खांद्यावर उचलून आणि तलवारीने केक कापून या तरुणांनी धुडगूस घातला. यावेळी हातात तलवार घेऊन समीर याने केक कापल्याच्या व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी पथकासोबत घटनास्थळी धाव घेतली. मात्र त्यावेळी हे टोळके तेथून पसार झाले होते. पोलिसांनी शोध घेऊन समीर शेख याच्यासोबत फौजी लबाना याला अटक केली. बाकी फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या