पारंपरिक खेळाला बदलाचा तडका, अल्टिमेट खो-खो लीगचे वेध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अल्टिमेट खो खो लीगच्या माध्यमातून या पारंपरिक खेळाला बदलाचा तडका देत आणखी खमंग बनविण्यात आले आहे. या लीगच्या पार्श्वभूमीवर बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात गुरुवारी खो-खोचा एक प्रदर्शनीय सामना खेळविण्यात आला. यातील सहभागी खेळाडूंनी पारंपरिक खो-खो खेळात झालेले बदल आणि कौशल्याचे अफलातून दर्शन घडविले.

खो-खोचा हा नवा अवतार सादर करण्यासाठी विविध संघांमधील 60 खेळाडू मैदानात उतरले आणि त्यांनी खेळातील विविध कौशल्यांचे चित्तथरारक दर्शन घडविले. त्यामुळे तेथे उपस्थित असलेला प्रत्येकजण भारावून गेला होता. या स्पर्धेतून अस्सल हिंदुस्थानी मातीतील खेळ असलेल्या खो-खोचे व्यावसायिक रूप सादर करण्यात आले. या लीगमध्ये चेन्नई क्विक गन्स (केएलओ स्पोर्ट्स), गुजरात जायंट्स (अदानी स्पोर्ट्स लाइन), मुंबई खिलाडीज् (बादशाह आणि पुनीत बालन), ओडिशा जगरनॉट्स (ओडिशा राज्य शासन), राजस्थान वॉरिअर्स (कॅप्री ग्लोबल) आणि तेलुगू योद्धाज (जीएमआर स्पोर्ट्स) हे संघ खेळणार आहेत.