
कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या विळख्यात सध्या अनेक देश आले आहेत. एक लाखांहून अधिक जीव घेणाऱ्या या विषाणूला संपवण्यासाठी जगातले तमाम शास्त्रज्ञ कामाला लागले आहेत. या दरम्यान एका शास्त्रज्ञाने विशिष्ट प्रकारची अतिनील किरणं कोरोनाला संपवू शकतात असा दावा केला आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डेविड ब्रेनर यांनी हा दावा केला आहे. डेविड कोलंबिया विद्यापीठाच्या सेंटर ऑफ रेडिओलॉजिक रिसर्च विभागात काम करतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, far-UVC नावाच्या अतिनील किरणांचा वापर कोरोनाला संपवण्यासाठी केला जाऊ शकतो. डेविड यांनी कोरोना संक्रमणापूर्वीच या प्रकारच्या किरणांवर अभ्यास सुरू केला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यांनी कोरोनाचे विषाणू या किरणांमुळे मरतात का, याचा शोध घ्यायला सुरुवात केली.
त्यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना व्हायरसच्या आधीच्या दोन प्रकारच्या विषाणूंवर या किरणांचा प्रयोग यशस्वी ठरला होता. या किरणांचा वापर करून कोरोनाला 95 टक्क्यांपर्यंत संपवण्यात यश आल्याचा दावा डेविड यांनी केला आहे. तसेच या अतिनील किरणांचा शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. त्वचेच्या पेशींना इजा न पोहोचवता हे किरण कोरोनाचा खात्मा करू शकतात, असंही डेविड यांचं म्हणणं आहे.



























































