ऑस्ट्रेलियाचे युवाही जगज्जेते

ऑस्ट्रेलियाने चौथ्यांदा पटकावले जगज्जेतेपद, जगज्जेतेपद राखण्यात हिंदुस्थानच्या युवांना अपयश

अडीच महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या पुरुष संघाने हिंदुस्थानचे जगज्जेतेपदाचे स्वप्न उद्ध्वस्त केले होते, तर आज ऑस्ट्रेलियाच्या युवा खेळाडूंनी हिंदुस्थानचे जगज्जेतेपद राखण्याचे स्वप्न भंग केले आणि तब्बल चौदा वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला युवा क्रिकेटचे चौथे जगज्जेतेपद जिंकून दिले.

आयसीसी युवा वर्ल्ड कपमध्ये नॉनस्टॉप सहा विजयांची नोंद करणारे हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियाचे संघ जगज्जेतेपदासाठी सामने आले, पण ऑस्ट्रेलियाने सलग सातव्या विजयाची नोंद केली. ऑस्ट्रेलियाने आघाडीच्या फलंदाजांच्या जोरावर उभारलेले 254 धावांचे आव्हान हिंदुस्थानी फलंदाजांना पेलवलेच नाही. वर्ल्ड कपच्या फायनलमधील ही सर्वोच्च धावसंख्या होती. स्पर्धेत विजयी षटकार ठोकणारा हिंदुस्थानी संघ पाठलाग करताना पुन्हा एकदा कोसळला. उपांत्य लढतीतही हिंदुस्थानची आघाडीची फळी कोलमडली होती. विशेष म्हणजे हिंदुस्थानने सलग पाचव्यांदा अंतिम फेरीत धडक मारताना आलटून पालटून जगज्जेते होण्याची परंपरा यंदाही कायम राखली. तसेच ऑस्ट्रेलिया हिंदुस्थानविरुद्ध फायनलमध्ये कधीच जिंकली नव्हती. यंदा त्यांनी ती मालिकाही खंडित केली. ऑस्ट्रेलियाने 14 वर्षांच्या वनवासानंतर पुन्हा एकदा जगज्जतेपद काबीज केले. त्यांनी 1988, 2002 आणि 2010 साली बाजी मारली होती.

तिन्ही ऑस्ट्रेलियन्स संघ वर्ल्ड चॅम्प

आयसीसीमध्ये पुरुष, महिला आणि युवा असे तीन वेगवेगळ्या गटांचे वर्ल्ड कप होतात आणि ऑस्ट्रेलियाच्या युवा संघानेही जगज्जेतेपद पटकावत क्रिकेटचे आम्हीच किंग असल्याचे दाखवून दिले. 2022मध्ये ऑस्ट्रेलियाच्या महिलांनी टी-20 वर्ल्ड कपचे जगज्जेतेपद जिंकले होते तर गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या पुरुष संघाने कसोटी आणि वन डे वर्ल्ड कप जिंकले. आता त्यांच्या युवा संघानेही जागतिक यश संपादत अनोखी हॅटट्रिक केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात एकच संघ तिन्ही गटांत अजिंक्य असण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सिंग-हीकने झुंजवले

शंभरीत 3 विकेट गेल्यावर हरजास सिंग आणि रायन हीक यांनी हिंदुस्थानी संघाचा घामटा काढला. हीकची खेळी 20 धावांचीच होती, पण हरजास सिंगच्या साथीने तो खंबीरपणे उभा राहिला. दोघांनी 66 धावांची भर घातली. मग जे वेबगेन आणि डिक्सनला जमले नाही ते हरजासने करून दाखवले. त्याने डावातील एकमेव अर्धशतक साजरे केले. त्याने आपल्या खेळीत 3 उत्तुंग षटकारही ठोकले. तो 55 धावांवर बाद झाल्यावर हिंदुस्थानी गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन विकेट टिपल्या खऱया, पण ऑलिव्हर हीकने 43 चेंडूंत 46 धावांची अभेद्य खेळी करताना ऑस्ट्रेलियाला 253 अशी जबरदस्त धावसंख्या उभारून दिली. लिंबाणीने 38 धावांत 3 विकेट घेत आजही आपली कामगिरी चोख बजावण्याचा प्रयत्न केला.

हिंदुस्थानचे शतकवीर ढेपाळले

वर्ल्ड कपमध्ये ठोकलेल्या 11 शतकांपैकी 5 शतके हिंदुस्थानी फलंदाजांनी ठोकली होती. मात्र हे शतकवीर आज ऑस्ट्रेलियन माऱयापुढे ढेपाळले. अर्शिन कुलकर्णी (3), मुशीर खान (22), उदय सहारन (8) आणि सचिन धस (9) या आघाडीवीरांनी स्पर्धेत खणखणीत शतकी खेळ्या साकारल्या होत्या, पण आज या भरवशाच्या सर्वच शतकवीरांनी मोक्याच्या क्षणी माती खाल्ली. पूर्ण स्पर्धेत प्रतिस्पर्ध्यांवर बरसलेला एकही फलंदाज संघाला जेतेपद मिळवून देण्यासाठी ऑस्ट्रेलियन माऱयापुढे उभा राहिला नाही.

बिअर्डमन-मॅकमिलनचा भेदक मारा

254 धावांचे आव्हान पाहूनच हिंदुस्थानी फलंदाजी हादरली होती. पॅलम विडलरचे पहिले षटक आदर्श सिंगने निर्धाव खेळून काढले आणि मग विडलरने आपल्या दुसऱया षटकात अर्शिन कुलकर्णीला बाद करून हिंदुस्थानी डावाला पहिला हादरा दिला. हा धक्का इतका जबर होता की या धक्क्यातून संघाला कुणीच बाहेर काढू शकला नाही. माहली बिअर्डमनने मुशीर खान आणि कर्णधार उदय सहारनला बाद करत ऑस्ट्रेलियाला जगज्जेतेपदा समीप नेले. पुढे रॅफ मॅकमिलनने सचिन धस आणि अरावेली अवनीश यांना बाद करत हिंदुस्थानची 6 बाद 91 अशी केविलवाणी अवस्था केली. मग राज लिंबाणीचा त्रिफळा उडवत मॅकमिलनने 8 बाद 122 अशी दुर्दशा करत ऑस्ट्रेलियाचे जगज्जेतेपद निश्चित केले. तळाला मुरुगन अभिषेकने 42 धावांची खणखणीत खेळी करत संघाचा पराभव लांबवला. अखेर हिंदुस्थानचा डाव 174 धावांवर संपुष्टात आणत ऑस्ट्रेलियाने 79 धावांच्या विजयासह जगज्जेतेपदावर चौथ्यांदा शिक्कामोर्तब केले.

ऑस्ट्रेलियाचे जबरदस्त आव्हान

त्याआधी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून अपेक्षेप्रमाणे फलंदाजीचा निर्णय घेतला. राज लिंबाणीने सॅम काsंसतासचा त्रिफळा उडवून हिंदुस्थानला दणदणीत सुरुवात करून दिली. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या सर्वच फलंदाजांनी आपापली खेळी करत संघाला अडीचशेचा टप्पा ओलांडून दिला. ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या धावांवर अंकुश मिळवणे आज हिंदुस्थानच्या गोलंदाजांना शक्य झाले नाही. इथेच हिंदुस्थानी गोलंदाजांनी आणि संघाने मार खाल्ला. काsंसतास बाद झाल्यानंतर हॅरी डिक्सन आणि कर्णधार ह्युज वेबगेनने 78 धावांची दमदार भागी रचत डावाला मजबुती दिली. वेबगेनचे अर्धशतक अवघ्या दोन धावांनी हुकले आणि डिक्सनही आपली पन्नाशी पूर्ण करू शकला नाही. नमन तिवारीने सलग षटकांत या दोघांना बाहेरचा रस्ता दाखवत हिंदुस्थानला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळवून दिली होती. पण ऑस्ट्रेलियन मधल्या फळीने हिंदुस्थानी संघाच्या चेहऱयावर दोन विकेटचा आनंद फार काळ टिकू दिला नाही.