
हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये झपाटय़ाने जगप्रसिद्ध झालेल्या अवघ्या चौदा वर्षीय धडाकेबाज फलंदाज वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा चर्चेच्या पेंद्रस्थानी आला आहे. या टप्प्यावर वैभवला युवा क्रिकेटमध्येच (19 वर्षांखालील) खेळवत राहिले तर त्याचा झंझावाती खेळ आपोआप मंदावेल, अशी भीती व्यक्त केलीय माजी हिंदुस्थानी क्रिकेटपटू डब्ल्यू. व्ही. रमण यांनी.
रमण यांनी समाजमाध्यमांवर लिहिले की, ‘वैभव सूर्यवंशी आता युवा क्रिकेटच्या खूप पुढे गेला आहे. जिथे युवा क्रिकेट त्याच्या प्रगतीला आव्हान देऊ शकते.’ त्यांच्या मते, इतक्या प्रगत अवस्थेत असलेला वैभव पुन्हा युवा स्तरावर खेळणे त्याच्या दीर्घकालीन विकासासाठी घातक ठरू शकते. सूर्यवंशीने ‘ए’ लिस्ट मालिकांमध्ये आणि आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून स्वतःची गुणवत्ता आधीच सिद्ध केली आहे. तो सामने जिंकून देऊ शकतो यात शंका नाही, मात्र मोठे चित्र डोळ्यासमोर ठेवणे अधिक महत्त्वाचे असल्याचे रमण यांनी स्पष्ट केले.
या विधानानंतर क्रिकेटप्रेमी आणि तज्ञांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काहींच्या मते वैभवसारख्या खेळाडूला थेट वरिष्ठ क्रिकेटकडे वळवले पाहिजे, तर काही जण अनुभवासाठी अंडर-19 क्रिकेट महत्त्वाचे मानता वैभव सूर्यवंशीची वाटचाल हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये विलक्षण ठरली आहे. अवघ्या 13 व्या वर्षी आयपीएल लिलावात निवड होणे, पहिल्याच हंगामात सात सामन्यांत 252 धावा, 36 ची सरासरी आणि 206 पेक्षा जास्त धावगती ही आकडेवारीच त्याची ताकद सांगते.
राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने 35 चेंडूंमध्ये शतक झळकावत आयपीएलमधील सर्वात जलद हिंदुस्थानी शतकाचा विक्रम केला. युवा आशिया चषकात 171 धावांची खेळी, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक, तसेच वरिष्ठ स्तरावरील विजय हजारे करंडकात 36 चेंडूंतील शतक ही कामगिरी त्याच्या असामान्य प्रतिभेची साक्ष देते.
त्यामुळे आता प्रश्न एकच उरला आहे. वैभव सूर्यवंशीचा पुढचा डाव अंडर-19 मध्ये खेळला जाणार की थेट हिंदुस्थानी वरिष्ठ क्रिकेटच्या रणांगणात? संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष याच उत्तराकडे लागले आहे.





























































