
गुजरातच्या बनासकांठा जिह्याच्या पालनपूर येथे बांधकाम सुरू असतानाच सोमवारी पूल कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. पूल कोसळणार असल्याची चाहूल लागताच जीव मुठीत घेऊन पुलाखालील व्यक्ती धावली, परंतु स्वतःचा जीव वाचवू शकली नाही. पुलाखाली दबून त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.
पालनपूर या ठिकाणी रेल्वे क्रॉसिंगवर या ओव्हर पुलाचे बांधकाम सुरू होते. दोन खांबांना जोडणारा गर्डर टाकण्यात आला. सोमवारी अचानक पुलाचे सहा गर्डर सेकंदात कोसळले. पुलाखाली असलेल्या व्यक्तीने पळायचा प्रयत्न केला. परंतु दुर्दैवाने यात मृत्यू झाला. पुलाखाली उभ्या असलेल्या ट्रक्टरचेही नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या मदतीने बचाव कार्य करण्यात आले. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला, अशी माहिती बनासकांठाचे जिल्हाधिकारी वरुण बरनवल यांनी दिली. दरम्यान, यांत्रिक अपयशामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
























































