
पश्चिम उपनगर आणि दक्षिण मुंबईची ‘कनेक्टिव्हिटी’ अधिक वेगवान करणाऱया भुयारी मेट्रोला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या महिन्यात आरे जेव्हीएलआर ते कफ परेड या संपूर्ण मार्गिकेवर मेट्रो धावू लागली. त्यानंतर प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. 1 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत भुयारी मेट्रोतून 38 लाख 63 हजार 741 मुंबईकरांनी प्रवास केला. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) रविवारी भुयारी मेट्रोच्या प्रवासी संख्येची माहिती दिली. त्यानुसार सध्या भुयारी मेट्रो मार्गिकेवरून दरदिवशी सरासरी 1 लाख 41 हजार लोक प्रवास करीत आहेत. ऑक्टोबर 2024 मध्ये भुयारी मेट्रोचा पहिला टप्पा प्रवासी सेवेत दाखल झाला होता. त्यावेळी या मार्गिकेवरील दैनंदिन प्रवासी संख्या 19 हजार होती.


























































