
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला आफ्रिकेच्या पश्चिमेकडली भागातील सेनेगल येथे अटक करण्यात आली आहे. हिंदुस्थानी यंत्रणांनी पुरवलेल्या माहितीच्या आधारे गुरुवारी सेनेगल पोलिसांनी रवी पुजारीच्या मुसक्या आवळल्या असून लवकरच त्याला हिंदुस्थानात आणले जाणार आहे.
हिंदुस्थानातला हवा असलेला रवी पुजारी काही दिवसांपूर्वी बुरकिना फासो येथे असल्याची माहिती हाती लागल्यापासून हिंदुस्थानी तपास यंत्रणा त्याच्या मागावर होत्या. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार पुजारीला बनावट पासपोर्ट प्रकरणी अटक करण्यात आले आहे. तो अँटोनी फर्नांडिस असे नाव धारण करून वावरत होता. पुजारीच्या प्रत्यार्पणाची कारवाई पूर्ण झाल्यावर त्याला विशेष विमानाने हिंदुस्थानात आणले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
रवी पुजारी विरोधात हिंदुस्थानात खंडणी, खून, अपहरणासारखे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. निर्माते महेश भट, शाहरूख खान आणि फराह खानसह बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटी पुजारीच्या हिटलिस्टवर होते. दरम्यान, गेल्या डिसेंबर महिन्यात मुंबई पोलिसांनी रवी पुजारीसाठी काम करणाऱ्या सादिक इब्राहिम बंगाली ऊर्फ सलमान (40) आणि धवल चंद्रप्पा देवरमनी (26) या दोन शार्प शुटर्सना सांताक्रुझ परिसरात सापळा रचून पकडले होते.
























































