मोदी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 28 लाखांच्या पार गेला आहे. सामान्य लोकांसह व्हीव्हीआयपी लोक देखील याच्या विळख्यात अडकत आहेत. आज मोदी सरकारमधील आणखी एका मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

‘प्रकृती अस्वास्थ्यामुळे व काही लक्षणे दिसल्याने मी कोरोना चाचणी केली आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी आयसोलेट व्हावे आणि चाचणी करून घ्यावी’, असे आवाहन गजेंद्र सिंह शेखावत यांनी केले आहे.

उच्चस्तरीय बैठकीत झाले होते सहभागी
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी दिल्लीत एका उच्चस्तरीय बैठकीत केंद्रीय मंत्री शेखावत सहभागी झाले होते. या बैठकीत हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची त्यांनी भेट घेतली होती. तसेच पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. केंद्रीय राज्यमंत्री रतन लाल कटारिया यांच्यासह अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते. त्यामुळे हा सर्वांना देखील ट्रेस करण्यात येत आहे. तसेच राजस्थानमध्ये ‘ऑपरेशन लोटस’मध्येही शेखावत हे सक्रिय होते.

दरम्यान, याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनाही कोरोनाची लागण झाली. शहा आणि मेघवाल यांनी कोरोनावर मात केली, मात्र शहा यांनी त्रास होऊ लागल्याने पुन्हा एम्समध्ये दाखल करण्यात आले.