
उत्तर प्रदेशातील हमीरपूरमध्ये झालेल्या एका लग्नाची सध्या जोरात चर्चा सुरू आहे. पन्नाशीच्या जवळ आलेल्या व्यक्तीने एका तृतीयपंथीयाशी लग्न केले आहे. एका मंदिरामध्ये जाऊन त्याने हे लग्न केले असून या जोडप्याने मंदिरातील खांबाभोवती सात फेऱ्या मारत सप्तपदी पार पाडली. यानंतर या दोघांनी सगळ्या गावाला बोलावलं आणि त्यांना जेवायला घालत थोरामोठ्यांचे आशिर्वाद घेतले.
हमीरपूर जिल्ह्यातील चिकासी परिसरातील खंगारन गावामध्ये हे लग्न पार पडलं असून इथे राहणाऱ्या नाथूराम सिंह यांना दोन मुले आहेत. त्यांच्या मोठ्या मुलाचं फार पूर्वी लग्न झालं आहे, मात्र लहान मुलाचं म्हणजेच छत्रपाल सिंह यांचे काही केल्या लग्न जुळत नव्हतं. छत्रपाल हे आता 48 वर्षांचे झाले असून त्यांची आपल्याला लग्नासाठी मुलगी मिळेल ही आशाच संपुष्यात आली होती. मात्र त्याचवेळी त्यांच्या आयुष्यात तृतीयपंथी बिल्लो रानी आली आणि छत्रपालचं आयुष्यच बदलून गेलं. बिल्लो रानीच्या प्रेमात पडल्याने छत्रपाल मोहरून गेला होता. त्याच्या रुक्ष, वाळवंटासमान आयुष्यात बिल्लो रानीच्या आगमनानंतर गारवा निर्माण झाल्यासारखा भासू लागला होता. त्याला सगळं गोड गुलाबी वाटू लागलं, ज्यामुळे त्याने बिल्लो रानीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
छत्रपाल हा बिल्लो रानीला घेऊन गावातील मंदिरात पोहोचला आणि पुजाऱ्यांच्या उपस्थितीत बिल्लोशी लग्न केलं. विशेष बाब ही आहे की सप्तपदी त्याने मंदिरातील खांबाभोवती सात फेऱ्या मारत पूर्ण केली. छत्रपालने लग्न केल्याचे कळताच त्याच्या गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकांनी डीजे लावला आणि त्यावर बेभानपणे नाचत जल्लोष केला. यानंतर छत्रपाल आणि त्याच्या घरच्यांनी गावजेवण घातले आणि गावातील थोरामोठ्यांकडून छत्रपाल आणि बिल्लोरानीच्या जोडीला आशिर्वाद देण्यास सांगितले.





















































