विद्यापीठे, महाविद्यालयांच्या दरमहा, त्रैमासिक फी भरण्याचा पर्याय द्या, युवासेनेची मागणी

yuva-sena

राज्यातील विद्यापीठे, तसेच महाविद्यालयांना फीवाढ न करण्याची, तसेच विद्यार्थी-पालकांना दरमहा किंवा तीन महिन्यांतून एकदा (त्रैमासिक) फी भरण्याची परवानगी द्या, अशी मागणी युवासेनेने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.

कोरोनामुळे पालकवर्ग आर्थिक अडचणीत आहे. या पार्श्वभूमीवर ‘यूजीसी’नेदेखील संलग्नित विद्यापीठे व महाविद्यालयांना शैक्षणिक फी जमा करण्याबाबत पर्याय दिले होते. त्या अनुषंगाने शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासेनेने उच्च व शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे विद्यार्थी-पालकांची आर्थिक स्थिती लक्षात घेता, शैक्षणिक फीमध्ये वाढ न करणे, तसेच पालकांच्या सोयीसाठी एकरकमी फी न घेता, दरमहा किंवा त्रैमासिक पद्धतीने फी भरण्याचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी युवासेना सचिव वरुण सरदेसाई, युवासेना कोअर कमिटी सदस्य साईनाथ दुर्गे यांनी केली आहे.

अतिरिक्त फी कमी करा
लॉकडाऊनमुळे सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. विद्यार्थी महाविद्यालयात जात नसल्याने शैक्षणिक साहित्य फी, लायब्ररी फी, जिमखाना फी, संगणक लॅब फी, इंटरनेट फी, इमारत दुरुस्ती फी, प्रोजेक्ट फी यांसारखी अतिरिक्त फी शैक्षणिक फीमधून वगळण्याची मागणीही युवासेनेने केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या