उन्नाव पीडितेवर हल्ला प्रकरणी कुलदीप सिंह सेंगरची निर्दोष मुक्तता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशच्या उन्नाव बलात्कार पीडितेवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी भाजपचे माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 2019मध्ये उन्नाव बलात्कार पीडितेचा रस्ते अपघात घडवून आणल्याचा आरोप त्याच्यावर होता.

दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाने सेंगर याची मुक्तता केली आहे. हे प्रकरण 2019मधील आहे. उन्नाव येथील बलात्कार पीडिता रायबरेलीला जात होती. वाटेत एका ट्रकने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. गाडीत पीडिता, तिची मावशी आणि तिचा वकील असे तिघे जण होते. या अपघातात पीडितेच्या मावशीचा मृत्यू झाला होता, तर पीडिता आणि वकील गंभीर जखमी झाले होते.

या अपघाताच्या दोन वर्षं आधी 4 जून 2017 रोजी पीडित मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. यानंतर तिच्या वडिलांचा कोठडीत मृत्यू झाला. 13 एप्रिल 2018 ला आमदाराला अटक करण्यात आली आणि सीबीआयकडून चौकशी झाली. त्यानंतर पीडितेचा अपघात झाला. सुदैवाने पीडिता या अपघातातून बचावली.

सेंगर यानेच हा अपघात घडवून आणल्याचा आरोप त्याच्यावर होता. त्या प्रकरणी दिल्ली येथील न्यायालयात सुनावणी झाली. या अपघात प्रकरणामध्ये सेंगर याच्यासह अन्य पाच आरोपींविरोधात प्रथमदर्शनी कोणतेही पुरावे आढळलेले नाहीत, ज्यांच्या आधारे पुढे खटला सुरू राहू शकतो. त्यामुळे या सहा जणांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. तर याच प्रकरणात आरोपी असलेल्या ट्रक चालकासह अन्य तीन जणांविरोधात न्यायालयाने आरोप निश्चित केले आहेत.

या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली असली तरी कुलदीप सेंगर हा कारागृहातच राहणार आहे. कारण, उन्नाव बलात्कार प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली असून पीडितेच्या वडिलांच्या हत्येच्या आरोपात 10 वर्षांची शिक्षा झाली आहे.