
उन्नावमध्ये बलात्कारानंतर जिवंत जाळून टाकण्यात आलेल्या तरुणीवर रविवारी दफनविधी करण्यात आला. तरुणीचा मृत्यू होऊन आठवडा होत आला तरी अद्याप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली नाही. त्यामुळे पीडितेचे कुटुंबीय संतापले असून त्यांनी पीडितेचा दफन केलेला मृतदेह बाहेर काढण्याचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यानंतर पीडितेचा मृतदेह दफन केलेल्या ठिकाणची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
उन्नावमध्ये बलात्कार पीडित तरुणी 5 डिसेंबरला न्यायालयात सुनावणीसाठी जात असताना तिच्यावर बलात्कार करणाऱ्यांनी तिला भररस्त्यात जाळले. 90 टक्के भाजलेल्या पीडितेने शुक्रवारी रात्री दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर रविवारी तिचा मृतदेह तिच्या मूळ गावी उन्नाव येथे आणण्यात आला. पीडितेच्या कुटुंबीयांनी जोपर्यंत मुख्यमंत्री भेटायला येत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका घेतली होती. मात्र नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढल्यावर त्यांनी मृतदेहाला दफन केले. मात्र या गोष्टीला पाच दिवस झाले तरी अद्याप मुख्यमंत्री भेटायला येत नसल्याने कुटुंबीयांनी मृतदेह दफन केला त्या ठिकाणीच धरणे धरले असून जर मुख्यमंत्री आले नाही तर मृतदेह बाहेर काढू असा इशारा दिला आहे.
उन्नाव सामूहिक बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. गावातीलच शिवम या तरुणाने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला आणि त्याचा व्हिडीओ काढून ब्लॅकमेलही केले. तिच्यावरील अत्याचाराची कहाणी येथूनच सुरू झाली. नंतर 12 डिसेंबर 2018 रोजी शिवम याने आपल्या मित्रासह तिच्यावर बलात्कार केला. रायबरेली कोर्टात केस दाखल झाली. शिवमने कोर्टात शरणागती पत्करली. 30 नोव्हेंबर 2019 रोजी तो जामिनावर सुटला आणि 5 डिसेंबर 2019 रोजी रायबरेली कोर्टात जाणाऱया तिला त्याने गाठले. पाच जणांनी मिळून तिला जिवंत जाळले. पोलिसांनी शिवम, त्याचे वडील रामकिशोर, शुभम, हरिशंकर आणि उमेश वाजपेयी या पाच नराधमांना अटक केली आहे.



























































