बठिंडातील सैनिकी तळावरील गोळीबारामागचे कारण स्पष्ट झाले, अनैसर्गिक संभोगासाठीच्या दबावामुळे हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बठिंडा येथील सैनिती तळावर झालेल्या गोळीबारामागचे कारण स्पष्ट झाले आहे. सुरुवातीला हा दहशतवादी हल्ला आहे का वैयक्तिक वादातून झालेली घटना याबाबत पोलीसही अनभिज्ञ होते. मात्र हल्ला झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच पोलिसांनी ही घटना दहशतवादी हल्ला नसून वैयक्तिक वादातून झालेली घटना असल्याचे स्पष्ट केले होते. या हत्याकांडाप्रकरणी पोलिसांनी एका जवानाला अटक केली होती. मोहन देसाई असं या आरोपीचं नाव असून त्याने पोलिसांना माहिती दिली आहे की अनैसर्गिक संभोगासाठी त्याच्यावर दबाव टाकण्यात येत होता आणि या रागातूनच त्याने चार जवानांची हत्या केली. हे चौघेजण मोहनवर सातत्याने संभोगासाठी दबाव टाकत होते, ज्याला तो कंटाळला होता असं सीएनएन-न्यूज18 ने याबाबत दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

मोहन देसाई हा शस्त्रास्त्र विभागात कामाला असून त्याने हल्ल्याच्या काही दिवस आधी शस्त्रागारातील इन्सास रायफल चोरली होती. 9 एप्रिलच्या पहाटे मोहनने ही रायफल चोरली होती. 12 एप्रिल रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास मोहन हा कामावर होता. सगळीकडे शांतता असल्याचे पाहून त्याने पहिल्या मजल्यावर झोपलेल्या 4 जणांची गोळ्या घालून हत्या केली. हत्या केल्यानंतर मोहनने बंदूक आणि 7 गोळ्या गटारामध्ये फेकून दिल्या होत्या. ही बंदूक आणि गोळ्या पोलिसांना सापडल्या असून त्यांनी त्या जप्त केल्या आहेत. मोहन देसाई हा मूळचा आंध्र प्रदेशचा असून त्याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी एक कहाणी रचून पोलिसांना सांगितली होती. मोहन देसाईने आपण घटनेचे साक्षीदार असल्याचे सांगित पोलिसांना म्हटले होते की, कुर्ता पायजमा घातलेली एक व्यक्ती आली होती आणि तिच्या हातामध्ये कुऱ्हाडही होती.