
गेले दोन दिवस अवकाळी पावसाने झोडपल्याने, द्राक्षे, डाळिंब आदी फळबागांसह रब्बीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सततच्या रिपरिप पावसामुळे ऊसतोड खोळंबली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पंढरपूर तालुक्यात कासेगाव, खर्डी, बोहाळी, उंबरगाव, तनाळी, शेटफळ, अनवली, रांझणी, चळे, करकंब, भाळवणी, वाडीकुरोली, आढीव आदी भागांत द्राक्षाचे क्षेत्र मोठे आहे. तर, तालुक्यात बहुतांश गावात डाळिंबाचे क्षेत्र आहे. या रिपरिप पावसामुळे हातातोंडाला आलेल्या डाळिंब बागेवर तेल्या, मररोग व कुजवा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सततच्या पावसामुळे डाळिंबाच्या कळ्या गळून पडत आहेत. दहा ते बारा हजार हेक्टरवरच्या डाळिंबाला फटका बसला आहे. त्यामुळे ऑक्टोबर बहार धरलेले शेतकरी अडचणीत आले आहेत.
डाळिंबानंतर दुसऱया क्रमांकावर द्राक्षांचे क्षेत्र आहे. गेल्या महिनाभरापासून ढगाळ वातावरण व अधूनमधून येणाऱ्या अवकाळी पावसाचा द्राक्षबागांवर परिणाम होत आहे. लाखो रुपये औषध-पाण्यावर खर्च करूनही बागेतील घड गळून पडत आहेत. घडात पाणी साचून राहत असल्याने मणी कुजत आहेत. त्यामुळे द्राक्षघडाचे मणी गळून फक्त देठ शिल्लक राहात आहेत. पाऊस झाल्यानंतर द्राक्षावर दावण्या, कुजवा रोग आक्रमण करीत आहेत. यामुळे तालुक्यात 8 हजार हेक्टरवरील द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान होत आहे.
द्राक्षबागांबरोबर बोर, डाळिंब, सीताफळ, पेरू आदी फळबागांचे रोगराईमुळे नुकसान होत आहे. ऐन थंडीच्या दिवसात ढगाळ वातावरण व अवकाळी पाऊस येत असल्याने फळबागांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
काढणीला आलेल्या मेथी, कोथिंबीर, पालक, शेपू आदी पालेभाज्यांचे मोठे नुकसान होत आहे. तर, टोमॅटोचेदेखील मोठे नुकसान होत आहे. गुरुवारी सकाळपासूनच मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस दिवसभर सुरू राहिल्याने जनावरांच्या चाऱयाचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तर शेळ्या, मेंढय़ांनाही चरण्यासाठी बाहेर सोडता येत नसल्याचे चित्र दिसत आहे.
परतीच्या पावसानंतर पाण्याने वाहू लागलेले ओढे, नाले बंद झाले होते. मात्र, सध्या झालेल्या अवकाळी पावसामुळे ओढे, नाले पाण्याने वाहू लागले आहेत. नुकतीच पेरणी केलेले ज्वारी, कडवळ, मका, कांदा, हरभरा, गहू पिकांत पाणी साचल्याने उगवणीवर परिणाम होत आहे.
ऊसतोडीवर परिणाम
अवकाळी पाऊस सुरू झाल्याने ऊसतोड थांबली आहे. धाडस करून ऊसवाहतूक करण्याचा प्रयत्न केला तर वाहने चिखलात फसत आहेत. त्यामुळे अपघात घडत आहेत. अवकाळी पाऊस सुरूच राहिला तर याचा थेट परिणाम साखर कारखान्यांच्या गाळपावर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

























































