मित्रांना खुश करण्यासाठी पतीने बनवला पत्नीचा अश्लील व्हिडीओ

प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन। लखनौ

उत्तर प्रदेशमधील मेरठ जिल्ह्यात नात्यांना काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथे एका पतीने मित्रांना खुश करण्यासाठी पत्नीचा अश्लील व्हिडीओ बनवून तो व्हायरल केल्याची संतापजनक घटना घडली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून पतीचा हा अत्याचार सहन करणाऱ्या पत्नीने अखेर त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी या विकृत पतीस अटक केली आहे.

मेरठ जिल्हयात राहणाऱ्या या पीडित महिलेचा पाच महिन्यांपूर्वीच नात्यातील एका तरुणाबरोबर विवाह झाला. पण लग्नाच्या पहिल्याच दिवशी त्याने पत्नीचा अश्लील व्हिडीओ बनवला. यास तिने विरोध करताच त्याने गंमत म्हणून व्हिडीओ काढल्याचे व डिलीट केल्याचे तिला सांगितले. पण त्यानंतर तो रोजच पत्नीवर दबाव आणून तिचे अश्लील व्हिडीओ काढू लागला. आपण हे व्हिडीओ मित्रांना खुश करण्यासाठी काढत असल्याचे त्याने पीडितेला सांगितले. यावरून दोघांत कडाक्याचे भांडणही झाले. त्यानंतर पतीने आपण यापुढे असे करणार नाही असे तिला सांगितले. पती सुधारल्याचे समजून पीडिताही खुश झाली. पण काही दिवसांनंतर त्याने पत्नीला मित्रांसोबत शय्यासोबत करण्यास सांगितले. यावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यावेळी त्याने तुझे सगळे अश्लील व्हिडीओ मित्रांनी बघितल्याचे तिला सांगितले. तसेच मित्रांसोबत शय्यासोबत करण्यास नकार दिल्यास ते व्हिडीओ सोशल साईटवर व्हायरल करण्याची तिला धमकी दिली. यामुळे संतप्त पत्नीने थेट पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर पतीला अटक करण्यात आले आहे.