
उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजपचा माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर याला दिल्ली उच्च न्यायालयाने काही अटींसह जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर या प्रकरणातील पीडिता दिल्लीतील इंडिया गेटजवळ आंदोलनाला बसली होती. तिला पोलिसांनी तेथून हटवले आहे. याबाबत पत्रकारांनी योगी सरकारचे मंत्री ओपी राजभर यांना विचारले असता त्यांनी हसत हसत पीडितेची टिंगल केली. या टिंगल टवाळीचा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोकांनी राजभर यांच्यासह भाजपवर जोरदार टीका केली आहे.
उत्तर प्रदेशमधील योगी सरकारचे मंत्री ओपी राजभर यांना उन्नाव पीडितेबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी हसत हसत पीडितेची टिंगल केली. pic.twitter.com/pLsjkhxeJl
— Saamana Online (@SaamanaOnline) December 24, 2025
उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजपचा माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर याला दिल्ली उच्च न्यायालयाने काही अटींसह जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने सेंगरला १५ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला आहे उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाने त्याला सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती सुब्रमोनियम प्रसाद आणि हरीश वैद्यनाथन शंकर यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला होता.
उन्नाव येथे 4 जून 2017 रोजी पीडित मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. यानंतर तिच्या वडिलांचा कोठडीत मृत्यू झाला. 13 एप्रिल 2018 ला भाजप आमदार कुलदीप सेंगरला अटक करण्यात आली आणि सीबीआयकडून चौकशी झाली. त्यानंतर कारच्या अपघातात संशयास्पदरीत्या तिच्या दोन नातेवाइकांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दोषी आणि भाजपातून हकालपट्टी झालेला आमदार कुलदीपसिंग सेंगरला दिल्लीच्या तीसहजारी न्यायालयाने 20 डिसेंबर 2019 रोजी बलात्कार, अपहरण, लैंगिक शोषण आणि पोक्सोअंतर्गत विविध कलमान्वये आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली होती.

























































