
सामना ऑनलाईन । लखनौ
भाजप मंत्र्यांमध्ये सध्या अजब विधान करण्याची जणू स्पर्धाच सुरूच आहे. उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचे मंत्री मोहसिन रजा यांनीही अजब विधान करुन खळबळ उडवली आहे. मंगळवारी पत्रकारांशी बोलताना रजा यांनी भाजप मुस्लीमद्वेष्टा पक्ष नसल्याचे सांगितले. आपला हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दाढीचा दाखला दिला. प्रामुख्याने दाढी हे इस्लामचे प्रतिक मानले जाते. पण मोदी मुस्लीम नसतानाही दाढी ठेवतात हेच रजा यांना यातून सांगायचे होते. हे दाखवण्यासाठीच त्यांनी मोदींच्या दाढीचा उल्लेख केला. रजा उत्तर प्रदेश सरकारमध्ये वक्फ विभागाचे राज्य मंत्री आहेत.
रजा लखनौ येथे अली मिया मेमोरियल हज हाऊसमधील हज ट्रेनिंग आणि लसीकरण मोहिमेचे उदघाटन करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी ”काही लोक भाजप हा मुस्लीमद्वेष्टा पक्ष असल्याचे वातावरण तयार करत आहे. पण हे सत्य नाही. जर भाजप मुस्लीम विरोधी पक्ष असता तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाढी नसती ठेवली. कारण दाढी हे पवित्र इस्लाम व मुस्लीम समाजाच प्रतिक असल्याचं मानलं जातं, असं उपस्थितींना रजा सांगितलं.
पण ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी आपला मुद्दा सगळ्यांना समजावा यासाठी बॉलिवुड चित्रपटातील डॉयलॉगचा आधार घेतला. ”इस्लाम मे दाढी है, दाढी में इस्लाम नही,” असंही ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी अल्पसंख्याक हा शब्दच उखडून फेकावयास हवा असे म्हटले.
























































