
उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली असतानाच योगी सरकारच्या मनातील काँग्रेसद्वेष चव्हाटय़ावर आला आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी बुधवारी पुन्हा ताब्यात घेतले. पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सफाई कर्मचाऱयाच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी त्या निघाल्या होत्या. आग्रा टोल प्लाजावर त्यांना रोखण्यात आले. कार्यकर्त्यांच्या हंगाम्यानंतर प्रियंका यांना आग्र्याला जाण्यास परवानगी दिली.
प्रियंका गांधींना मागील 17 दिवसांत पोलिसांनी दुसऱयांदा ताब्यात घेतले. याआधी 3 ऑक्टोबरला लखीमपूर हिंसाचार प्रकरणात मृत शेतकऱयांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यावेळी 30 तास ताब्यात ठेवल्यानंतर अटक केली होती. बुधवारी अडीच तास ताब्यात ठेवले होते. त्यानंतर प्रियंका यांना आग्य्राला जाण्यासाठी सोडून देण्यात आले. सफाई कर्मचारी अरुण वाल्मीकीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूबाबत संशय वर्तवला जात आहे. याच पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था बिघडू नये म्हणून प्रियंका गांधींना लखनौ-आग्रा एक्प्रेस वेवर रोखण्यात आले होते.
जिथे जाते तिथे अडवतात; मी रेस्टॉरंटमध्ये बसू का?
पोलिसांच्या कारवाईवर प्रियंका गांधींनी संताप व्यक्त केला. कुणाच्याही मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना भेटायला गेल्यामुळे कायदा-सुव्यवस्था कशी बिघडू शकते? तुम्हा लोकांना खूश करण्यासाठी मी लखनौच्या गेस्ट हाऊसमध्ये आरामात बसून राहू का? कुणा व्यक्तीला पोलीस कोठडीत बेदम मारहाण करणे हा कुठला न्याय आहे? मी जिथे जाते तिथे अडवले जाते. मी काय रेस्टॉरंटमध्ये बसू का, असा संतप्त सवाल प्रियंका यांनी केला.
























































