भयंकर ! काळा वर्ण असल्याने पत्नीने पतीला जिवंत जाळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। बरेली

उत्तर प्रदेशमधील बरेली जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी भयंकर घटना घडली आहे. पतीचा वर्ण काळा असल्याने चिडलेल्या पत्नीने त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला जिवंत जाळले. यात पतीचा मृत्यू झाला असून पत्नीला अटक करण्यात आली आहे. प्रेमश्री असे आरोपी महिलेचे नाव असून सत्यवीर असे तिच्या पतीचे नाव आहे.

बरेलीतील फतेहगढ येथे राहणाऱ्या सत्यवीर व प्रेमश्रीचे दोन वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्यांना पाच महिन्यांची मुलगीही आहे. पण सत्यवीर वर्णाने काळा असल्याने प्रेमश्रीला तो आवडत नव्हता. ती सतत त्याला त्याच्या काळ्या रंगावरून टोमणे मारायची. यावरून दोघात किरकोळ वादही होत. पण सत्यवीरचे पत्नीवर प्रेम असल्याने तो नेहमी तिच्याकडे दुर्लक्ष करायचा. पण सोमवारी सकाळी पाचच्या सुमारास सत्यवीर झोपेत असताना प्रेमश्रीने त्याच्या अंगावर पेट्रोल ओतले व त्याला पेटवून दिले. तर सत्यवीरच्या अंगावर पेट्रोल ओतताना त्यातील थोडे पेट्रोल प्रेमश्रीच्या पायावर सांडल्याने तिचे पायही भाजले. यादरम्यान, मदतीसाठी आरडाओरडा करणाऱ्या सत्यवीरचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी त्याच्या घराकडे धाव घेतली. त्यानंतर सत्यवीरला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत प्रेमश्रीला सत्यवीर आवडत नसल्याचे समोर आले. यामुळे पोलिसांना प्रेमश्रीवर संशय आला. त्यानंतर तिची चौकशी केली असता पती काळा असल्याने त्याला जिवंत जाळल्याची कबुली तिने दिली.