हाथरस कट प्रकरणः पत्रकार सिद्दीकी कप्पनची जामीनावर सुटका करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
journalist Siddiqui Kappan

हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेशी संबंधित कट रचल्याप्रकरणी 2020 पासून तुरुंगात असलेल्या पत्रकार सिद्दीकी कप्पनला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सहमती दर्शवली.

केरळमधील पत्रकारावर कठोर बेकायदेशीर कृती (प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि कनिष्ठ न्यायालयांनी वारंवार जामीन नाकारल्यानंतर ऑक्टोबर 2020 पासून तो तुरुंगात आहे.

शांतता भंग केल्याच्या आरोपावरून त्याला इतर तिघांसोबत अटक करण्यात आली होती. पण नंतर त्याच्यावर देशद्रोह आणि दहशतवाद विरोधी कायदा UAPA आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप लावण्यात आला होता.

सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की ते तपासाच्या प्रगतीवर आणि फिर्यादीद्वारे संकलित केलेल्या गोष्टींवर भाष्य करणार नाही. कारण वाद हा त्याच्यावर आरोप निश्चित करण्यासंदर्भात आहे. तसेच या खटल्यात त्याचा सहभाग दर्शवणारे पुरावे काय आहेत, अशी विचारणाही त्यांनी फिर्यादी पक्षाला केली.

कप्पनला तीन दिवसांच्या आत ट्रायल कोर्टात नेले जाईल आणि योग्य अटींवर जामीनावर सोडण्यात येईल, असे कोर्टाने सांगितले.