नाशिक – मुंबई नाका भागातील घटनेने खळबळ, इमारतीच्या बंद गाळ्यात मानवी अवयव आढळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
nashik-mumbai-naka

मुंबई नाका परिसरातील एका इमारतीच्या बंद गाळ्यात रविवारी रात्री प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये मानवी चेहर्‍याशी संबंधित अवयव आढळल्याने एकच खळबळ उडाली. गाळा मालकाच्या डॉक्टर मुलाने अभ्यासासाठी पूर्वीच हे अवयव आणल्याचा अंदाज असून, संबंधिताचा याबाबत जबाब घेतला जाणार आहे.

मुंबई नाका परिसरातील हरीविहार सोसायटी येथील इमारतीच्या बंद गाळ्यामधून दुर्गंध येत होता. याबाबत सोसायटीचे चेअरमन जहीर अब्दुल रहेमान शेख यांनी रविवारी रात्री मुंबई नाका पोलिसांना माहिती दिली. हा गाळा गंगापूररोडवरील शुभांगी वसंतराव शिंदे यांच्या मालकीचा असून, गेल्या 15 ते 20 वर्षांपासून बंदच होता. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचांसमक्ष झडती घेतली असता त्या गाळ्यात भंगार सामानासह दोन प्लॅस्टिकचे हवाबंद डबे सापडले. त्यात सहा कान, मेंदुसह एक कान, डोळ्यासह मेंदू् असे मानवी चेहर्‍याशी संबंधित अवयव पॅरॅफीन द्रव्यात ठेवलेले आढळले.

अभ्यासासाठी अवयव आणल्याचा दावा

गाळा मालक असलेल्या शुभांगी शिंदे यांचा मोठा मुलगा किरण हा ईएनटी सर्जन आहे. काही वर्षांपूर्वी त्याने शिक्षण घेत असताना अभ्यासाच्या उद्देशाने मुंबईतील एका हॉस्पिटलमधून ते कान, मानवी चेहर्‍याशी संबंधित अवयव अधिकृतरित्या घेतल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले. मात्र, त्यांची योग्य काळजी घेतली नाही, तसेच विल्हेवाट न लावता निष्काळजीपणे ठेवले. याबद्दल डॉ. किरण शिंदे यांचा जबाब घेण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक चंद्रकांत अहिरे यांनी दिली.