
सामना प्रतिनिधी। उरण
खोपटे गाव परिसरात वसलेल्या न्यु ट्रान्स इंडिया प्रकल्पाच्या उभारणीसाठी या भागातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी कवडीमोल भावाने दिल्या आहेत . त्या सर्वांना आजतागायत रोजगार मिळालेला नाही म्हणून अनेकांनी टेम्पो खरेदी केले आहेत . मात्र या कंपनी परिसरात असलेल्या प्रस्तावित शिवकृपा टेंपो वाहतूक संस्थेकडून प्रकल्पबाधित असलेल्या शेतकऱ्यांना देखील टेम्पो युनियनमध्ये टेम्पो घेण्यास मज्जाव केला जात असल्याने येथील भूमिपुत्र शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे . या अन्यायग्रस्त सर्व शेतकऱ्यांनी असे उपाशी मरण्यापेक्षा आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मंगळवारपासून (27) खोपटे येथील ट्रान्स इंडिया कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर आपल्या कुटुंबियांसह आमरण उपोषण करण्याचे हत्यार उगारले आहे .
उरण तालुक्याच्या पुर्व भागात वसलेल्या कंटेनर गोदामांच्या निमित्ताने येथील टेम्पो व्यवसाय तेजीत आहे . एका टेम्पोमागे बऱ्यापैकी उत्पन्न टेम्पो मालकांना महिन्याकाठी मिळत आहे . त्यामुळे आपल्या व्यवसायात इतर कोणी घुसल्यास आपली फुकटची कमाईत घट होईल अशी भीती असल्याने प्रस्थापित अनेक जण इतरांना काही ना काही कारणे देत आपल्या संघटनेत घेण्याबाबत नाखूष असतात . असाच काहीसा प्रकार ट्रान्स इंडिया कंपनीच्या ठिकाणी चालणाऱ्या टेम्पोच्या निमित्ताने झाला आहे . या ठिकाणी आमच्याही जमिनी गेल्या असल्याने आम्हालाही टेम्पो युनियन मध्ये घेतले पाहिजे असा उपोषणकर्त्यांचा दावा आहे.
अन्यायग्रस्त शेतकऱ्यांसोबत आत्तापर्यंत एसीपी , डीसीपी , तहसीलदार आदी ठिकाणी बैठका झाल्या . त्या बैठकांच्या अनुषंगाने उरणच्या तहसीलदारांनी देखील संबंधित टेंपो संस्था आणि ट्रान्स इंडिया कंपनी प्रशासनाला या उपोषणाबाबत कळवून उपोषणापासून संबंधितांना परावृत्त करण्याबाबत कळविले आहे . मात्र अन्यायग्रस्त शेतकऱयांना आजच्या तारखेपर्यंत तरी न्याय मिळालेला नसल्याने त्यांनी उद्याच्या उपोषणावर ठाम राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे .






























































