
हिंदुस्थान-कॅनडा राजनैतिक तणाव कायम असून हिंदुस्थाननं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसंच कॅनडातील आपल्या नागरिकांना खबरदारी घेण्यास सांगितली आहे. असं असतानाच अमेरिकेनं म्हटलं आहे की त्यांनी ‘सार्वजनिक आणि खासगीरित्या’ हिंदुस्थान सरकारला शीख फुटीरतावादी नेता हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येच्या कॅनडाच्या तपासात सहकार्य करण्याची विनंती केली आहे. अमेरिकेनं असंही म्हटलं आहे की तपास पुढे जाणे आवश्यक आहे असून दोषींना शासन करण्याचंही आवाहन केलं आहे.
आपल्या दैनंदिन पत्रकार परिषदेत या प्रकरणाला संबोधित करताना, परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी कॅनडाच्या आरोपांची सखोल चौकशी करण्याच्या महत्त्वावर जोर दिला. ‘आम्ही (कॅनडाचे) पंतप्रधान (जस्टिन) ट्रुडो यांनी संदर्भित केलेल्या आरोपांमुळे खूप चिंतित आहोत. आम्ही आमच्या कॅनेडियन सहकाऱ्यांशी संपर्कात आहोत’, असं मिलर यांनी सांगितलं.
‘आमचा विश्वास आहे की कॅनडाचा तपास पुढे जाणे आणि गुन्हेगारांना शासन होणे आवश्यक आहे. आणि आम्ही सार्वजनिकरित्या – आणि खासगीरित्या – हिंदुस्थान सरकारला कॅनडाच्या तपासात सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे’, असं ते एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.
निज्जरच्या हत्येत हिंदुस्थानी अधिकारी सहभागी असल्याचा आरोप कॅनडानं यापूर्वी केला होता, मात्र हा दावा हिंदुस्थान सरकारनं स्पष्ट शब्दात नाकारला होता.
दरम्यान, कॅलिफोर्नियाचं प्रतिनिधित्व करणारं यूएस हाऊसचे सदस्य जिम कोस्टा यांनी देखील कॅनेडियन निज्जर याच्या हत्येच्या अहवालांबाबत चिंता व्यक्त केली.