मानवाच्या शरीरात धडधडले डुकराचे हृदय, 57 वर्षीय व्यक्तीवर यशस्वी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हृदय निकामी झालेल्या व्यक्तीला दुसरे हृदय प्रत्यारोपण करण्याची गरज असते. हृदय मिळण्यास उशीर झाल्यास त्या व्यक्तीचा मृत्यूदेखील होऊ शकतो. परंतु अमेरिकेतील डॉक्टरांनी विज्ञानाच्या क्षेत्रात चमत्कार घडवला आहे. जगात पहिल्यांदाच मानवाच्या शरीरात चक्क डुकराचे हृदय प्रत्यारोपण करण्याची किमया डॉक्टरांनी केली आहे. तब्बल सात तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत असून हे प्रत्यारोपण कितपत यशस्वी ठरेल याबाबत आताच सांगणे योग्य ठरणार नाही.

अमेरिकेतील मेरीलॅण्ड येथील डेव्हिड बेनेट यांच्या शरीरात डुकराचे हृदय बसवले आहे. ते बऱ्याच काळापासून हृदयरोगाच्या समस्येला तोंड देत होते. त्यांना प्रत्यारोपणासाठी बऱ्याच प्रयत्नांनंतरही हृदय मिळत नव्हते. अशावेळी एका बाजूला मरण आणि दुसऱ्या बाजूला डुकराच्या हृदयाचे प्रत्यारोपण असे दोन पर्याय आपल्यापुढे होते असे डेव्हिड यांनी सांगितले. डेव्हिड यांनी डुकराचे हृदय प्रत्यारोपणाचा पर्याय निवडला.  डॉ. बार्टली ग्रिफीथ म्हणाले, ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली तर विज्ञानाच्या क्षेत्रातील हा मोठा चमत्कार असेल. गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेल्या अवयव प्रत्यारोपणाच्या प्रयोगांमध्ये ही शस्त्रक्रिया मैलाचा दगड ठरेल. आम्ही रुग्णावर बारीक नजर ठेवून आहेत. येत्या काही दिवसांत येणारे परिणाम महत्त्वाचे ठरणार आहेत.

डुकराचेच हृदय का?

इतर प्राण्यांच्या तुलनेत डुकराचे हृदय मानवी शरीरात प्रत्यारोपण करण्यासाठी उपयुक्त आहे. मात्र डुकराच्या सेल्समध्ये अल्फा-गल शुगर सेल असल्याने डुकराचे हृदय जशास तसे लावल्यास रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे प्रत्यारोपणापूर्वी डुकराच्या शरीरात काही अनुवांशिक बदल केले होते. या शस्त्रक्रियेसाठी वापरलेले हृदय युनायटेड थेरेप्युटिक्सची सहाय्यक पंपनी रेविविकोरच्या लॅबमधून आणले होते. अमेरिकेमधील एफडीएने याच्या वापरासाठी आपत्कालीन मंजुरी दिली होती.