
अमेरिका, इस्रायल-इराण युद्धाची तीव्रता वाढत आहे. त्यातच आता होर्मुझ सामुद्रधुनी वाहतुकीसाठी खुली झाली नाही तरी युद्धातून बाहेर पडण्याचे संकेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. त्यामुळे जागतिक शेअर बाजारात तेजी दित आहे. तसेच कच्च्या तेलाच्या किमतीतही घट झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती घटल्याने शेअर बाजाराला आता तेजीचे वेध लागले आहेत.
शेअर बाजारात मोठ्या तेजीची चिन्हे दिसत आहेत. मंगळवारी वॉल स्ट्रीट फ्युचर्समध्ये १ टक्क्याने वाढ झाली. त्यातून अमेरिकन बाजारात दमदार तेजीचे संकेत मिळाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील युद्धातून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे ही तेजी आली आहे.
तेलाच्या किमती १ टक्क्याहून अधिक घसरल्यामुळेही शेअर बाजारात तेजीच्या संकेतांना बळ मिळत आहे. सकाळी NASDAQ-100 चे फ्युचर्स भाव ०.५५ टक्क्यांनी वाढले होते. S&P 500 चे फ्युचर्स ०.७ टक्क्यांनी, तर डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेजचे फ्युचर्स ०.८ टक्क्यांनी वाढले. मंगळवारी तेलाच्या किमतीत लक्षणीय घट दिसून येत आहे.
एका अहवालानुसार, युद्ध संपवण्याची किंवा त्यातून बाहेर पडण्याची ट्रम्प यांची इच्छा आहे, त्यामुळे अमेरिकन बाजारात मोठ्या तेजीची चिन्हे दिसत आहेत. गिफ्टनिफ्टी सुमारे १३५ अंकांनी वाढ दर्शवत आहे. तसेच सुरुवातीच्या व्यवहारात २ टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर, ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती १.२२ डॉलरने, म्हणजेच १.०८ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल १११.५६ डॉलरवर आल्या. नैसर्गिक वायूच्या किमती आणि डॉलर निर्देशांकही घसरत आहेत.
तज्ज्ञांच्या मते, कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण ही अल्पकालीन युद्धविरामाची शक्यता दर्शवते. त्यांनी पुढे सांगितले की, कोणताही महत्त्वपूर्ण बदल होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होण्यावर अवलंबून असेल. वॉल स्ट्रीट जर्नलने सोमवारी अमेरिकी सरकारी अधिकाऱ्यांचा हवाला देत वृत्त दिले की, होर्मुझची सामुद्रधुनी मोठ्या प्रमाणात बंद राहिली तरीही, नंतर ती पुन्हा उघडण्याच्या शक्यतेसह, ट्रम्प संघर्ष संपवण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे जागतिक शेअर बाजारासह हिंदुस्थानी शेअर बाजारात तेजीचे संकेत मिळत आहेत.




























































