अमेरिकेत पडतोय प्लास्टिकचा पाऊस, शास्त्रज्ञ संभ्रमात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। न्यूयॉर्क

आतापर्यंत आपण पैशांचा पाऊस, माश्यांचा पाऊस, काळा पाऊस याबद्दल ऐकलं आहे. पण अमेरिकेत चक्क प्लास्टिकचा पाऊस पडत असल्याची धक्कादायक माहिती संशोधनातून समोर आली आहे.

अमेरिकेतील भौगौलिक संशोधन विभागाचे प्राध्यापक आणि इतर शास्त्रज्ञांनी नुकत्याच केलेल्या संशोधनात अमेरिकेत प्लास्टीकच्या कणांचा पाऊस पडत असल्याचे समोर आले आहे. पावसात आढळणारे प्लास्टीकचे कण साध्या डोळ्यांनी दिसत नसून मायक्रोस्कोप आणि डिजिटल कॅमेऱ्यातून दिसत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

पावसाच्या पाण्याची चाचणी केली असता त्यात 90 टक्के प्लास्टीकचे कण आढळले. यातील बहुतेक प्लास्टीक फायबर स्वरुपात होते. त्याशिवाय हे प्लास्टीक रंगीबेरंगी रंगात होते असेही संशोधकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागांपेक्षा शहरांमध्ये हे प्लास्टीक मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आले. तर समुद्रसपाटीपासून 10400 फूट उंचावरील डोंगर भागात कोसळणाऱ्या पावसातही प्लास्टीकचे कण आढळले आहेत. पण पावसात हे प्लास्टीक आले कुठुन हे मात्र अजून समोर झालेले नाही. मात्र जगभारत प्लास्टीकचा वापर मर्यादेपेक्षा जास्त होत असल्यानेच पावसात प्लास्टीकचे कण आढळले असावे अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. हवेत, पाण्यात आणि मातीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टीक जमा होत आहे. त्याचाच हा परिणाम असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

याआधी दक्षिण फ्रान्समध्येही पावसाच्या पाण्याबरोबर प्लास्टीकचे कण पडत असल्याचे पाहण्यात आले होते. दरम्यान, आपल्याला सध्या दिसतोय त्यापेक्षा अनेक पटीने जास्त प्लास्टीक आपल्या आजूबाजूला असून हवेतून,पाण्यातून ते आपल्या शरीरात जात असून याप्रमाणे दर आठवड्याला 5 ग्रॅम प्लास्टीक आपल्या पोटात जात असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.