Advisory Issued for Indians IN US- रशियामध्ये 8.8 तीव्रतेचा भूकंप; अमेरिकेतील हिंदुस्थानींसाठी मार्गदर्शक सूचना जारी

रशियाच्या कामचटका बेटाजवळ हिंदुस्थानी वेळेनुसार बुधवारी पहाटे 4 वाजून 55 मिनिटांनी एक शक्तीशाली भूकंप झाला. अमेरिकन भूगर्भ तज्ज्ञांनीही याची पुष्टी केली आहे. त्यामुळे आता जपान, रशिया आणि अमेरिकेतील किनारी राज्यांना त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. या तीव्र भूकंपामुळे अमेरिकेचेही मोठे नुकसान झाले आहे.  अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील हिंदुस्थानी वाणिज्य दूतावासाने कॅलिफोर्निया आणि हवाई या पश्चिम किनारी राज्यांमध्ये राहणाऱ्या हिंदुस्थानी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

रशियाच्या कामचटका बेटांजवळ भूकंप झाल्यानंतर रशिया आणि जपानच्या किनारी भागांमध्ये त्सुनामीच्या लाटांचा तडाखा बसण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता हिंदुस्थानी वाणिज्य दूतावासाने हिंदुस्थानी नागरिकांच्या सुरक्षेसाठी एक एडवाइजरी जारी केली आहे. रशियाच्या कामचटका बेटाजवळ झालेल्या 8.8 तीव्रतेच्या भूकंपानंतर आम्ही संभाव्य त्सुनामीच्या धोक्यावर लक्ष ठेवून आहोत असे हिंदुस्थानी वाणिज्य दूतावासाने म्हटले आहे.

अमेरिकेतील नागरिकांनी आता स्थानिक सूचनांचे पालन करा. आपत्कालीन व्यवस्थापन आणि अमेरिकन त्सुनामी दर्शवणाऱ्या केंद्रांसह अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या इशाऱ्यांचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. त्सुनामी बाबत कोणतीही माहिती आली तर लगेचच सुरक्षित उंच ठिकाणी जा. तसेच लोकांनी अमेरिकेच्या किनारी भागात न जाण्याचे आवाहन या एडवाजरीमधून करण्यात आले आहे.

आपत्कालीन परिस्थितीसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी

लोकांना कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार राहण्यास सांगण्यात आले आहे. तसेच प्रत्येकाने आपले सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरण चार्ज ठेवणे देखील महत्तावाचे असल्याचे सांगितले आहे. सॅन फ्रान्सिस्कोमधील हिंदुस्थानी वाणिज्य दूतावासाने नागरिकांना आपत्कालिन स्थितीतून बाहेर काढण्यासाठी +1-415-483-6629 हा हेल्पलाइन क्रमांक देखील जारी केला आहे.