
‘हेल्मेट हे केवळ वाहतूक पोलीस दिसल्यावरच घालण्याची गोष्ट नाही, तर आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी आहे. हेल्मेट घालून केस खराब झालेले चालतील, पण स्वतःचे आणि आपल्या कुटुंबीयांचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका. डोकं शाबूत ठेवण्यासाठी डोक्याचा वापर करा…हेल्मेट वापरा’ असे आवाहन अभिनेता श्रेयस तळपदे यांनी नुकतेच केले.
राज्यात सुरू असलेल्या 32 व्या राज्य रस्ते सुरक्षा अभियाना निमित्ताने शिव वाहतूक सेना आणि युवासेवा फाऊंडेशन यांच्यातर्फे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी वरील आवाहन श्रेयस तळपदे यांनी केले. यावेळी शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर, माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा, युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर, स.पो.नि.उत्तर परिक्षेत्र कपिले मॅडम, क्रिकेट प्रशिक्षक नीलेश भोसले, प्रभारी वाहतूक निरीक्षक मुकुंद यादव आदी मान्यवर उपस्थित होते. रस्ते सुरक्षा प्रवत्ते विनय मोरे यांनी यावेळी माहितीपूर्ण मार्गदर्शन केले.
यावेळी गोरेगाव वाहतूक विभागातील वाहतूक पोलीस बांधवांना तसेच दुचाकीस्वार वाहनचालकांना मोफत हेल्मेट, परावर्तक जाकीट, रस्ते सुरक्षा मार्गदर्शिका पुस्तिका, प्रथमोपचार पेटी आणि अग्निप्रतिबंधक उपकरण यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन मोहन गोयल यांनी केले तर सूत्रसंचालन कल्पेश बालघरे यांनी केले. कार्यक्रमस्थळी रस्ते सुरक्षाविषयक प्रबोधन करणारा शिरविरहित मनुष्यदेखील सगळ्यांचे विशेष लक्ष वेधून घेत होता.
























































