
> बेकिंग सोडय़ामुळे फळे आणि पालेभाज्या स्वच्छ धुता येतात. फळांवरील बॅक्टेरिया बेकिंग सोडय़ाने नष्ट करता येतात. त्यासाठी एका मोठय़ा भांडय़ात पाणी घेऊन त्यात दोन चमचे बेकिंग सोडा घाला. या पाण्याने फळे व पालेभाज्या धुतल्या तर स्वच्छ होतात.
> एका वाटीत बेकिंग सोडा उघडाच ठेवून ती वाटी फ्रिजमध्ये ठेवायची. यामुळे फ्रिजमधील फळे, भाज्या व अन्य कुठलेही पदार्थ ताजे टवटवीत राहातात. फ्रिजमध्ये दुर्गंध येत असेल तरीही हा उपाय करता येईल.
> मायक्रोवेव्ह साफ करणं फार कठीण काम असतं. पण बेकिंग सोडय़ाने हे काम सहजसोपे होते. मायक्रोवेव्हमध्ये छोटय़ा भांडय़ात बेकिंग सोडा मिश्रीत पाणी ठेवून मायक्रोवेव्ह 1 ते 2 मिनिटे तापवा. तो आतून स्वच्छ होईल.
> कितीही साफ केलं तरी शौचालय स्वच्छ होत नाही. पण बेकिंग सोडा यावर रामबाण उपाय ठरू शकतो. एका मोठय़ा बाटलीत गरम पाणी घेऊन त्यात एक कप बेकिंग सोडा घाला. या पाण्याने शौचालय साफ केल्यास त्यावरील डाग निघून जातील.
> कपडय़ांवरील काही डाग कितीही प्रयत्न केले तरी घालवता येत नाहीत. पाव कप बेकिंग सोडा घेऊन त्यात थोडी डिटर्जंट पावडर मिसळून ते मशीनमध्ये घाला. या पाण्यात कपडे घातले की हट्टी डागही स्वच्छ होतात.
> बेकिंग सोडा बाटलीत भरून स्वयंपाकघरात ठेवून द्यायचा. दुर्दैवाने आग लागलीच तर आगीवर बाटलीतील हा बेकिंग सोडा टाकायचा. यामुळे आग काही अंशी कमी होऊ शकते. मोठा धोका टळतो.
> घाण साफ करण्याचं नैसर्गिक साधन म्हणजे बेकिंग सोडा. त्यामुळे टॉयलेटमध्ये थोडा बेकिंग सोडा टाकून ब्रशने साफ केल्यास टॉयलेट चकचकीत होते. बाथरूम स्वच्छ करण्यासाठीही बेकिंग सोडय़ाचा वापर करू शकाल.































































