ऑस्ट्रेलियात कसोटी खेळत असलेल्या क्रिकेटपटूच्या भावाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । सिडनी

ऑस्ट्रेलियात सध्या सुरू असलेल्या गावस्कर-बॉर्डर मालिकेत खेळत असलेल्या उस्मान ख्वाजा या ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. अर्सलन ख्वाजा असे त्याचे नाव असून त्याला जामीन देण्यासही न्यायालयाने नकार दिला आहे. अर्सलनवर दाखल असलेल्या गुन्ह्यातील त्याच्या विरोधातील साक्षीदारांवर दबाव टाकल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.

अर्सलन ख्वाजा याचे एका महिलेवर प्रेम होते. त्याच्यासोबतच काम करणाऱ्या निझामुद्दीन याचे देखील त्याच महिलेवर प्रेम होते. न्यू साऊथ वेल्स युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीत सापडलेल्या वहीमध्ये माजी पंतप्रधान मॅल्कम टर्नबुल, माजी उपपंतप्रधान ज्युली बिशप यांची हत्या करण्याचा तसेच देशातील मोठी स्थानकं उडवून देण्याचा कट लिहून ठेवला होता. ती वही निझामुद्दीनची होती. त्याप्रकरणी निझामुद्दीनला अटक करण्यात आली होती. मात्र तपासाअंती अर्सलनने निझामुद्दीनला फसविण्यासाठी हा प्रकार घडवून आणल्याचे समोर आले होते. या प्रकरणी 4 डिसेंबरला अर्सलनला अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने अर्सलनला जामीन देखील मंजूर केला होता. जामीनाच्या काळात अर्सलनने त्याच्याविरोधात साक्ष देणाऱ्या महिलेला व तिच्या भावाला धमकविले. त्यामुळे अर्सलनला परत अटक करण्यात आले असून त्याला जामीनही नाकारला आहे.