
उत्तर प्रदेशच्या अमरोहा जिल्ह्यातील रुग्णालयात सहा महिने पगार घेऊन कामाला दांडी मारणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे. उप वैद्यकीय कार्यकारी अधिकारी ब्रजेश पाठक यांनी ही कारवाई केली आहे.
ही कारवाई झालेल्या अधिकाऱ्याचं नाव डॉ. इंदू बाला शर्मा असं आहे. शर्मा या अमरोहा येथील जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी पदावर काम करतात. गेले सहा महिने खोटी स्वाक्षरी करून त्यांनी रुग्णालयात उपस्थिती दर्शवली होती. मात्र, प्रत्यक्षात त्या या दरम्यान कधीही रुग्णालयात आल्या नाहीत. या दरम्यान त्यांना स्वाक्षरीची नोंद असल्याने पगारही मिळाला.
हा प्रकार जिल्ह्याचे उप वैद्यकीय कार्यकारी अधिकारी ब्रजेश पाठक यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी शर्मा यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. शर्मा यांचं तत्काळ निलंबन करण्यात आलं आहे.
त्याखेरीज त्यांचा पगार काढणाऱ्या संतोष कुमार या लिपिकावरही कारवाई करण्यात आली आहे. तसंच, या सहा महिन्यांत मुख्य कार्यकारी वैद्यकीय अधिकारी असलेल्या संजय अग्रवाल याच्या चौकशीचेही आदेश देण्यात आले आहेत. या कारवाईनंतर वैद्यकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.























































