
उत्तर प्रदेश एटीएसच्या पथकाने टेरर फंडिंगच्या आरोपाखाली भिवंडी येथील तिघा तरुणांना पकडले. त्या तिघांनाही ट्रान्झिट रिमांडवर यूपीला नेण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.
ते तिघे तरुण भिवंडीतल्या शांती नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे आहेत. तिघेही 22 वर्षांचे असून टेरर फंडिंगशी संबंधित एका मोठय़ा नेटवर्कचा हे तिघे हिस्सा असल्याचे सांगण्यात येते. उत्तर प्रदेश एटीएसचे पथक तिघांकडे अधिक चौकशी करीत आहेत.
अटक करण्यात आलेल्या तरुणांची ओळख पटली असून अय्यान हुसेन, अबू आणि जैद अब्दुल अशी त्यांची नावे असल्याचे समजते. एटीएसच्या अधिकाऱयांनी सांगितले की, ही अटक एका मोठय़ा टेरर फंडिंग नेटवर्कचा भाग आहे, ज्यामध्ये संशयितांवर दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत पुरवण्याचा आरोप आहे. चौकशीदरम्यान या तरुणांकडून अनेक महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत, ज्यांचा तपास सुरू आहे. सध्या सर्वांना यूपीमध्ये नेण्यात आले आहे, जिथे पुढील चौकशी आणि रिमांडची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. तपास यंत्रणा आता त्यांचे बँक खाते, मोबाईल रेकॉर्ड आणि संपर्कांची सखोल चौकशी करत आहेत.