
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, राजस्थानचे माजी राज्यपाल आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह यांचे शनिवारी रात्री निधन झाले. अयोध्येतील नियोजित श्रीराम मंदिराचे खंदे पुरस्कर्ते म्हणून ते ओळखले जायचे. गेल्या दीड महिन्यापासून त्यांच्यावर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच शनिवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. ते 89 वर्षांचे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, त्यांच्या निधनानंतर उत्तर प्रदेशमध्ये पुढील तीन दिवस शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
कल्याण सिंह यांचा जन्म 5 जानेवारी 1931 रोजी उत्तर प्रदेशच्या अलीगढ येथील मढौली गावी झाला होता. कल्याण सिंह हे उत्तर प्रदेश येथील भाजपचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांनी दोनवेळा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभळली होती. 24 जून 1991 ते 6 डिसेंबर ते 1992च्या काळात त्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ सांभाळला. त्यानंतर 21 सप्टेंबर 1997 ते 12 नोव्हेंबर 1999 पर्यंत त्यांनी दुसऱयांदा मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. कल्याण सिंह यांना रक्तदाबाचा त्रास सुरू झाल्याने 4 जुलै रोजी येथील एसजीपीजीआय रुग्णायात दाखल करण्यात आले होते.
































































