मृतदेह सोडल्याने गंगा झाली मैली, पाणी आणि मातीवर दुष्परिणाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाग्रस्त मृतांवर अंत्यसंस्कारासाठी जागा आणि सामान न मिळाल्याने ते गंगा नदीत प्रवाहित करण्यात आले होते. त्यामुळे गंगा नदी मैली झाली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशात असे मृतदेह गंगेत तरंगताना आढळले. या प्रकारामुळे गंगेचे पाणी आणि मातीवर निश्चितच दुष्परिणाम झाले असणार असा संशोधकांचा अंदाज आहे. त्याचा आढावा आता आयआयटीमधील संशोधक घेणार आहेत.

कानपूरमधील आयआयटी संस्थेतील संशोधकांची टीम हे काम करणार आहे. ऊन्नाव, कानपूर, कनौज, फतेहरपूर आणि रायबरेली येथे गंगेच्या पात्रात मृतदेह तरंगताना आढळले होते. राष्ट्रीय गंगा स्वच्छता मोहीमेने त्याची गंभीर दखल घेतली आहे. या मृतदेहांमुळे गंगेचे पाणी आणि मातीवर काय परिणाम झाले याचा अभ्यास केला जाणार असल्याची माहिती मोहीमेचे सल्लागार प्रा. विनोद तारे यांनी दिली.

नदीपात्रात मृतदेह प्रवाहित करण्यास बंदी घालण्याचा तज्ञांचा सल्ला

प्रा. तारे हे आयआयटींच्या पर्यावरण विज्ञान विभागासाठीही काम करतात. नद्यांमध्ये मृतदेह प्रवाहित करण्यावर संपूर्ण बंदी घातली जावी असे त्यांचे मत आहे. यापुढे असे प्रकार होऊ नयेत म्हणून सरकारने आवश्यक व्यवस्था करावी असा सल्लाही त्यांनी दिला आहे. अगदी नद्यांच्या किनाऱयांवरही अंत्यसंस्कार करणे नागरिकांनी बंद केले पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले आहे. संबंधित जिह्यांतील नद्यांच्या पात्रांमध्ये आता पोलिसांनी होडय़ांमधून गस्त घालायला सुरूवात केली आहे.