रेल रोकोचा प्रयत्न, हॉस्टेलमध्ये घुसून पोलिसांची विद्यार्थ्यांना मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली असून येत्या 10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. अशातच बेरोजगारीचा कंटाळलेल्या काही विद्यार्थ्यांनी सरकारच लक्ष वेधून घेण्यासाठी आणि भरती प्रक्रियेत तेजी आणण्यासाठी प्रयागराज येथे रेल रोको आंदोलन केलं आहे. या विद्यार्थ्यांनी बेरोजगारीच्या मुद्दयावर आंदोलन करत रेल्वे रुळावर बसत बराच वेळ रेल्वे वाहतूक थांबवली होती. नंतर पोलिसांनी लाठीचार्ज करत या विद्यार्थ्यांना रेल्वे रुळावरून हटवलं.

हॉस्टेलमध्ये घुसून पोलिसांनी विद्यार्थ्यांना केली मारहाण

रेल रोको आंदोलनानंतर पोलिसांनी या विद्यार्थ्यांना ते राहत असलेल्या हॉस्टेलमध्ये घुसत त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या संबंधित काही व्हिडीओ देखील समोर आले आहेत. ज्यामध्ये पोलीस बंदुकीच्या बटाने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तर काही पोलीस दरवाज्यावर लाथा मारत दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितलं की, आम्ही परिसरात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक बदमाशाचा शोध घेत आहोत.

विरोधकांनी योगी सरकारला घेरलं

व्हायरल झालेले व्हिडीओ पाहून समाजवादी पक्ष आणि प्रियांका गांधी यांनी योगी सरकारवर निशाणा साधला आहे. विद्यार्थ्यांवरील हा अत्याचार त्वरित थांबवावा, असे ते म्हणाले आहेत. समाजवादी पक्षाने ट्विट करत लिहिले आहे की, एनटीपीसी निकालाविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना हटवण्यासाठी प्रयागराजमधील छोटा बगडा लॉजमध्ये घुसून पोलिसांनी निष्पाप विद्यार्थ्यांवर केलेला अमानुष लाठीचार्ज अत्यंत निषेधार्ह आहे! प्रत्येक पावलावर दडपशाही करणाऱ्या भाजप सरकारला यावेळी तरुण उलथवून टाकतील. तरुणाची ही क्रांती 2022 मध्ये मोठा बदल घडवून आणणार आहे.